|
पुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशोत्सवात कृत्रिम तलाव आणि श्री गणेशमूर्ती दान या अशास्त्रीय संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तीची घोर विटंबना थांबवण्यासाठी, तसेच श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी विसर्जन घाट बंद केल्याविषयी २८ ऑगस्ट या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदने देण्यात आली. अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे आणि कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनाही विसर्जन कालावधीत नदीपात्रात अधिक पाणी सोडण्याविषयी निवेदने देण्यात आली. वरील निवेदनाच्या अनुषंगाने ३० ऑगस्टला पुणे महापालिकेचे घनकचरा विभागाचे उपायुक्त श्री. संतोष कदम यांच्या कार्यालयात समितीचे श्री. पराग गोखले, श्री. कृष्णाजी पाटील, श्री. मनोहरलाल उणेचा आदींनी प्रत्यक्ष भेट घेतली. उपायुक्त श्री. संतोष कदम यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यावर त्यांना एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता आले नाही.
वरील सर्व मागण्यांचे निवेदन यापूर्वीच पुणे महापालिकेला दिले आहेत, तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती श्री गणेशमूर्तींच्या होणार्या विटंबनेविषयी निवेदने देत आहे आणि वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून याकडे लक्षही वेधले आहे; मात्र असे असूनही या वर्षीही नागरिकांनी मूर्ती संकलन केंद्रांमध्ये श्री गणेशमूर्तींचे दान करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. काही ठिकाणी भाविकांनी वहात्या पाण्यात विसर्जन करू नये; म्हणून घाट बंद करून घाटांवर कृत्रिम हौद बांधण्यात आले होते.
महापालिकेच्या भोंगळ कारभाराची उदाहरणे !१. कसबा पेठ वृद्धेश्वर मंदिरासमोरील घाटात भाविकांकडून नदीमध्ये विसर्जन करण्यासाठी कोणतीही सुरक्षाव्यवस्था करण्यात आली नाही. २. वृद्धेश्वर-सिद्धेश्वर घाट या ठिकाणी नदीपात्रात जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. नदीपात्रात घाणीचे प्रचंड साम्राज्य आहे. आधीच हे प्रदूषित असूनही प्रदूषण होऊ नये म्हणून मूर्तीदान संकलन करत आहेत. ३. एस्.एम्. जोशी घाट नदीपात्राकडे जाणारा रस्ता पूर्णपणे कापडाने बंद करण्यात आला आहे. कापडाच्या मागील भागी प्रतिवर्षी नदीमध्ये विसर्जन करणारे भाविक तेथे थांबून विसर्जन करतात. तेथे काही सुरक्षाव्यवस्था नाही. ४. आधीच नदी पात्रात ‘ड्रेनेज’चे पाणी जात असूनही केवळ विसर्जन केल्याने प्रदूषण होते, असा कांगावा महापालिका करत आहे. बर्याच ठिकाणी घाटात विसर्जन व्यवस्था केली नसून दान घेणे आणि मूर्ती संकलन करणे एवढेच केले असल्याचे दिसून आले. ५. तुटपुंजी सुरक्षाव्यवस्था असून जे सुरक्षा करत आहेत, ते केवळ एका जागी बसून बघ्याची भूमिका बजावत आहेत. पाटबंधारे खात्याने तर पाणी सोडलेच नाही. ६. विसर्जन घाटावर पुणे महापालिकेकडून मूर्तीदान करण्यासाठीचे फलक लावले असून भाविकांना मूर्तीदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. |