गणेशोत्सव विशेष…
गणेशोत्सव चालू झाला आहे. गणेशोत्सव म्हणजे लहान-थोर सर्वांच्या आनंदाचा आणि जिव्हाळ्याचा सण आहे. गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. गणरायांच्या स्वागताची सिद्धता सर्वजण आपापल्या परीने मनोभावे करतात. गणरायांची विविध भक्तीगीते कानी पडू लागली की, मन लगेच प्रसन्न होते आणि आपण कधी ती गुणगुणू लागतो, ते आपल्याला कळतही नाही. ही भक्तीगीते गणेशोत्सव काळात ध्वनीक्षेपकाद्वारे लावली जात असल्याने वातावरण उल्हासित होते.
गणपतीशी संबंधित भक्तीगीते हा गणेशोत्सवातील महत्त्वाचा आणि अविभाज्य घटक आहे; परंतु खरच आज ती भक्तीगीतांपर्यंतच मर्यादित राहिली आहेत का हो ? सध्या विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये सकाळी भक्तीगीते लावली की, दुपारनंतर कधी त्या भक्तीगीतांचे रूपांतर चित्रपटगीतांमध्ये होते, ते लक्षातही येत नाही ! पहाटे ‘ओंकारप्रधान रूप गणेशाचे…’, ‘प्रथम तुला वंदितो…’, अशा प्रसिद्ध भक्तीगीतांनी आरंभ होतो; परंतु सायंकाळनंतर मात्र हळूहळू मोठ्या आवाजात ‘डीजे’वर चित्रपटगीते वा अश्लील, विकृत अशीही गीते लावली जातात. या वेळी तरुणांसह लहान-मोठेही या चित्रपटगीतांवर बेभानपणे नाचतात.
केवळ भक्तीगीतांपर्यंतच हा विषय मर्यादित नाही, गणपतीच्या विविध आरत्याही आता काही ठिकाणी चित्रपटगीतांच्या तालावर म्हटल्या जातात. आरती म्हणतांना ‘जयदेव जयदेव…’, असे मोठ्या आवाजात म्हणणे आणि तेवढेच २ शब्द म्हणून हसणे, हे तर आता नेहमीचेच झाले आहे. याने खरेच श्री गणेशाची भक्ती करण्याचा हेतू साध्य होतो का ? नक्कीच नाही. उलट या अपप्रकारांमुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य न्यून होते. मोठी माणसेही त्याकडे दुर्लक्षच करतात; पण यातून आपण श्री गणरायाचे विडंबन करून त्याची अवकृपाच ओढवून घेत आहोत, हे कुणाला लक्षात येत नाही. दुर्दैवाने असे न्यूनाधिक प्रमाणात सर्वच ठिकाणी होत आहे. कोकणात तर श्री गणेशोत्सव भव्यदिव्यपणे आणि आत्मियतेने साजरा केला जातो. तिथेही वरील प्रकारच्या अपप्रकारांनी शिरकाव केला आहे; परंतु कोकणातील भजन संस्कृतीमुळे गणेशोत्सवातील पावित्र्य आणि भक्ती तुलनेत का होईना टिकून आहे. गणेशोत्सवाचा उद्देश समजून घेऊन तो भक्तीभावाने साजरा केल्यास अन् आपले आचरण सुधारल्यास निश्चितच गणरायाची कृपा आपल्या सर्वांवर होईल. त्यामुळे प्रत्येकानेच या गणेशोत्सवापासून वरील अपप्रकार टाळण्यासाठी स्वतः प्रयत्न करून इतरांचेही प्रबोधन करूया. सर्वांना यासाठी प्रेरणा आणि बळ मिळो, अशी बुद्धीदात्या श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना !