गोदावरीच्या (नाशिक शहर) महापुराची चेतावणी देणारी नारोशंकर मंदिरावरील घंटा आणि तिची वैशिष्ट्ये !

  •  नारोशंकराची घंटा झाली ३०४ वर्षांची ! 

  • मराठ्यांच्या विजयाचे आणि पराक्रमाचे  प्रतीक आहे नारोशंकर घंटा !

नाशिक शहरातील अत्यंत पुरातन समजल्या जाणार्‍या नारोशंकर महादेव मंदिरावर असलेल्या घंटेच्या निमिर्तीला ३०४ वर्षे पूर्ण झाली आहेत. ही घंटा वर्ष १७२१ मध्ये सिद्ध  करण्यात आली आहे. यंदा वर्ष २०२४ मध्ये तिला ३०४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

१. चिमाजीअप्पा पेशवे यांनी पोर्तुगिजांविरुद्ध झालेल्या लढाईत विजय मिळवल्याचे आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून आणल्या ३ घंटा !

या घंटेवर वर्ष १७२१ हे कोरलेले असून ती पोर्तुगीज कारागिरांनी सिद्ध केलेली आहे. या घंटेवर युरोपियन आणि अरेबियन लिपीत काही अक्षरे लिहिली आहेत. थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजीअप्पा पेशवे यांनी पोर्तुगिजांविरुद्ध झालेल्या लढाईत वर्ष १७३८ मध्ये वसईमधून विजयानंतर ही घंटा आणली. ही घंटा मराठ्यांच्या विजयाचे आणि पराक्रमाचे प्रतीक मानली जाते. तेव्हा एकूण ३ घंटा आणण्यात आल्या होत्या. पैकी एक नाशिकच्या नारोशंकर मंदिरात, दुसरी भीमाशंकर मंदिरात, तर तिसरी घंटा पिलाजीराव जाधव यांनी सासवडच्या भैरवनाथ मंदिरात दिली आहे. या घंटा काशाच्या धातूपासून बनवलेल्या आहेत. कासे हा धातू कथिल, तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणाने सिद्ध केला जातो अन् हा धातू कधीही न गंजणारा असतो.

२. नारोशंकर मंदिराची उभारणी आणि मंदिरावर घंटेची स्थापना

नारोशंकराच्या मंदिरावर असलेली घंटा आजही सुस्थितीत असून पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. नारोशंकराच्या मंदिरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, लॉर्ड माऊंट बॅटन, श्री श्री रविशंकर अशा अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. वर्ष १७४७ मध्ये सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांनी १८ लाख रुपये व्यय करून नारोशंकर महादेवाचे मंदिर बांधले. ही घंटा वसईच्या विजयानंतर वर्ष १७४० मध्ये आणली; परंतु ती घंटा वसईचे सुभेदार फडके यांच्याकडे ठेवली होती. कार्याच्या व्यापामुळे नारोशंकर यांनी वर्ष १७५७ मध्ये नाशिकला स्थायिक झाल्यावर ही घंटा हत्तीवर आणून मंदिरात बसवली. नदीला पूर आल्यानंतर या घंटेचा आवाज ३ किलोमीटर लांब आवाज जात असे. नारोशंकराच्या मंदिराला पूर्वी ‘रामेश्वर मंदिर’ म्हणून ओळखले जात होते. हे मंदिर बांधण्यासाठी राजस्थान आणि गुजरात येथून कुशल कारागीर आणण्यात आले. मंदिर ३७.७९ मीटर X २५.२९ मीटर आवारात बांधले गेले आहे. त्याच्या चारही बाजूंनी ५.५ मीटर उंचीचा संरक्षक कोट बांधला आहे. गोदावरीच्या पुरातून संरक्षण होण्यासाठी हा कोट बांधला आहे. चारही कोपर्‍यात बुरुज आहेत. मंदिर उत्तर हिंदुस्थानी नागरशैलीत बांधलेले आहे. मंदिर अत्यंत भव्य आणि सुंदर असून स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे मुख्य शिखर २६ मीटर उंचीचे असून त्यावर पौराणिक प्रसंग, हत्ती, सिंह प्राण्यांची शिल्पे कोरली आहेत.

३. दगड मारल्याने घंटेला तडा

या घंटेला अज्ञात व्यक्तीने काही वर्षांपूर्वी दगड मारला. त्यामुळे या घंटेला तडा गेला. या वेळी राजेबहाद्दर कुटुंबियांनी मूर्तीकारांचे साहाय्य घेऊन घंटेची दुरुस्ती केली. घंटेतील लोलक हा सुमारे १० किलोचा आहे. येणारे पर्यटक कुतूहलाने तो हालवत होते. त्यामुळे परिसरात आवाज येत असल्याने हा लोलक काढून ठेवण्यात आला आहे.

४. घंटेद्वारे महापुराची चेतावणी

या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हालत होता. त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा, त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची. या घंटेचा आवाज हा ३ किलोमीटरपर्यंत पोचत असे. मधल्या कालावधीत नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह म्हणूनही या घंटेच्या चित्राचा वापर करण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रत्येक कागदावर या घंटेचे चित्र पहायला मिळते.

(साभार : संकेतस्थळे )

कशी आहे नारोशंकर घंटा ?

नारोशंकर महादेव मंदिरावर बांधलेली घंटा

नारोशंकर मंदिराच्या घंटेचा परिघ ६ फूट, व्यास १०० सेंटीमीटर आणि उंची १०७ सेंटीमीटर, घंटेवरची कडी ७ सेंटीमीटर असून तिचे वजन २० मण (८०० किलो) आहे. घंटेचा लोलक १० किलोचा असून त्याला ३ कड्या आहेत.

(साभार : संकेतस्थळ)