पुणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमा’चे आयोजन !

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ह.भ.प. प्रल्हाद महाराज भुईभार

पुणे, ३ सप्टेंबर (वार्ता.) – ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार’ यांच्या वतीने निघोजे येथील पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता आठवीच्या मुलांसाठी ‘ओळख श्री ज्ञानेश्वरी’ उपक्रम चालू करण्यात आला. या वेळी ह.भ.प. श्री प्रल्हाद महाराज भुईभार यांनी पाठात माऊलींचे चरित्र सांगून मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरीमधील मार्गदर्शक ओव्यांवर मार्गदर्शन करत आळंदीतील स्थानमहात्म्य सांगत मुलांशी संवाद साधला. आळंदीतील श्रींच्या संजीवन समाधी मंदिराची माहिती दिली. या वेळी माऊलींचे चरित्र त्यांनी सांगितले. श्री ज्ञानेश्वरीमधील अध्याय आणि गीतेच्या श्लोकांची प्राथमिक माहिती दिली. हरिपाठ, श्री ज्ञानेश्वरीमधील १२ आणि १५ व्या अध्यायाचे वाचन, भजनी मालिका वाचन, गायन, पसायदान यांवर सविस्तर संवाद साधण्यात आला. या प्रसंगी पत्रकार अर्जुन मेदनकर, सोमनाथ बेंडाले, मुख्याध्यापक श्री. काटकर, तसेच शिक्षक आदी उपस्थित होते.