१. गुरुकृपेमुळे त्रासाची तीव्रता न जाणवणे
‘आधुनिक वैद्यांना (न्यूरो, स्पायनल सर्जन) ‘एम्.आर्.आय्.’ चाचणीचा अहवाल दाखवल्यानंतर त्यांनी ‘या दुखण्यामध्ये किती वेदना असतात, ते केवळ रुग्णच समजू शकतो’, असे कुटुंबियांना सांगितले. ते ऐकल्यावर मला वाटले, ‘गुरुकृपेमुळे मला वेदनांची तीव्रता जाणवत नाही. हा त्रास सहन करण्याचे बळ श्री गुरूंनीच दिले होते. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘प्रारब्धभोग भोगून संपवावेच लागतात’, या दिलेल्या शिकवणीमुळे आणि ते भोगतांना सेवा अन् साधना करत राहिल्याने मला त्रासाची तीव्रता जाणवली नाही.
२. आजारपणामुळे मन अस्थिर होणे, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘शस्त्रकर्म आणि आयुर्वेदिक उपचार दोन्हीची तयारी ठेव’, असे सांगणे, मानसोपचारतज्ञ आणि कुटुंबीय यांच्याशी बोलल्याने परिस्थिती स्वीकारता येणे
आजारपणामुळे आरंभी मी थोडी अस्थिर झाले होते. ‘एम्.आर्.आय्.’ चाचणीचा अहवाल पाहिल्यावर ‘एवढा त्रास कसा झाला ?’, असे मला वाटले. ‘आजारपणामुळे माझ्या सेवेसाठी इतरांना वेळ द्यावा लागतो. माझी सेवाही व्यवस्थित होत नाही आणि पुढेही सेवा करण्यास मला मर्यादा येतील’, हे स्वीकारणे मला कठीण जात होते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ‘शस्त्रकर्म आणि आयुर्वेदिक उपचार दोन्हीची सिद्धता ठेव’, असे सांगितले. त्यानुसार मी स्वयंसूचना घेत होते. मला एक आध्यात्मिक स्तरावरील उपायही करण्यास सांगितले होते. सौ. सुप्रिया माथूर आणि मानसोपचारतज्ञ यांच्याशी, तसेच घरच्यांशी मोकळेपणाने बोलल्यामुळे मला परिस्थिती स्वीकारता आली.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन आणि प्रेम यांमुळे मन सकारात्मक रहाणे अन् मनात आजारपणाविषयीचे विचार न येणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘सेवेविषयी काही काळजी करू नको. या कालावधीत व्यष्टी साधना कर. ‘ऑनलाईन’ घेण्यात येणारा ‘व्यष्टी साधनेचा आढावा’ आणि ‘भक्तीसत्संग’ ऐक. त्यामुळे तुझे मन सकारात्मक आणि स्थिर राहील. तसेच शारीरिकदृष्ट्याही लवकर बरे होण्यास साहाय्य होईल.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढून मला ‘प्रसाद आणि उपायांसाठी विभूती’ दिली. या कालावधीत त्यांनी मला पुष्कळ प्रेम दिले. त्यामुळे माझ्या मनातील आजारपणाविषयीचे विचार दूर झाले.
४. संत आणि साधक यांच्या उदाहरणांमधून सेवेसाठी प्रेरणा मिळणे
तीव्र शारीरिक त्रास असतांनाही सतत साधनारत रहाणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्यासारखे संत आणि अत्यंत प्रतिकूल स्थितीतही साधक करत असलेल्या सेवेची उदाहरणे माझ्यापुढे होती. त्यामुळे मला सेवेसाठी प्रेरणा मिळत असे.
५. रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका आणि कर्मचारी अतिशय नम्र, हसतमुख आणि सेवाभावी वृत्तीचे असणे
ज्या रुग्णालयामध्ये माझे शस्त्रकर्म झाले, ते रुग्णालय अतिशय स्वच्छ आणि चांगले होते. रुग्णालयात आश्रमासारखी स्वच्छता होती. तेथील आधुनिक वैद्य, परिचारिका, कर्मचारी इत्यादी सर्वच अतिशय नम्र, हसतमुख आणि सेवाभावी होते. शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य, त्यांची साहाय्यक वैद्या, भूलतज्ञ आणि माझ्या संपर्कात आलेल्या परिचारिका यांचे बोलणे, वागणे पाहून ‘ते कर्मयोगी आहेत’, असे मला वाटत होते. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना मला चांगले वाटत होते. आधुनिक वैद्य सर्व प्रश्नांची नेमकेपणाने उत्तरे देऊन रुग्णांचे समाधान करत होते.
६. रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेत होणारा विलंब देवाने रुग्णालयाचे व्यवस्थापन पहाणार्या महिलेच्या माध्यमातून सोडवणे
आम्हाला रुग्णालयातून सोडण्याच्या (डिस्चार्ज) प्रक्रियेत थोडा विलंब होत होता. त्याच वेळी एक महिला आमच्या खोलीत येऊन ‘आम्हाला काही अडचण नाही ना ?’, असे जाणून घेत होत्या. आम्ही त्यांना आमची अडचण सांगितली. त्यानंतर काही मिनिटांतच आमची प्रक्रिया पूर्ण झाली. त्या महिला रुग्णालयातील व्यवस्थापन पहाणार्या होत्या. त्या वेळी ‘आमची अडचण सोडवण्यासाठी देवानेच त्यांना पाठवले’, असे आम्हाला वाटले. ‘हे रुग्णालय एक आदर्श रुग्णालय असल्याचे उदाहरण म्हणून सांगता येईल’, असे मला वाटले. गुरुकृपेमुळेच अशा रुग्णालयात माझे शस्त्रकर्म झाले.
७. साधक आणि कुटुंबीय यांनी काळजी घेणे
मी मला जमेल तशी सेवा करत होते. सेवेतील इतर गोष्टी सहसाधिकांनी सांभाळून घेतल्या आणि आजारपणातही माझी काळजी घेतली. माझ्या कुटुंबियांनीही या आजारपणाच्या कालावधीत माझी काळजी घेऊन सेवा केली.
८. कृतज्ञता
या आजारपणाच्या कालावधीत सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी साधक, कुटुंबीय, आधुनिक वैद्य, रुग्णालयात शस्त्रकर्म उत्तम होणे, अशी कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून माझी सर्वतोपरी काळजी घेतली. त्या वेळी ‘गुरु किती भरभरून देतात’, या विचाराने मला कृतज्ञता वाटत होती. भ्रमणभाष आणि भ्रमणसंगणक यांमुळेही मी आजारपणाच्या कालावधीत सेवा करू शकले. त्या उपकरणांबद्दलही मला कृतज्ञता वाटत होती. गुरुदेवांप्रती वाटणारी कृतज्ञता मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘गुरु सर्वतोपरी काळजी घेत असतात’, ही जाणीव सतत राहू दे आणि ‘गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना माझ्याकडून होऊ दे’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.४.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |