भोपाळ – मध्यप्रदेशातील एका कनिष्ठ न्यायालयाने बलात्कार आणि हत्या पीडित एका ४ वर्षांच्या मुलीचे छायाचित्र आणि नाव प्रसिद्ध केल्याच्या प्रकरणी ‘राजस्थान पत्रिका’चे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांना दोषी ठरवले. न्यायालयाने चारही आरोपी प्रकाशक रूपराम, २ संपादक अमित आणि जिनेश आणि पत्रकार कृष्णपाल यांना प्रत्येकी एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा आणि २२ सहस्र रुपये दंड ठोठावला. आरोपींचे कृत्य लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा), २०१२च्या कलम २३ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम २२८(अ) या कलमांचे उल्लंघन करते, असे कनिष्ठ न्यायालयाने निकालात म्हटले आहे. या व्यतिरिक्त, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्याचे कलम ७४ काळजी आणि संरक्षण याची आवश्यकता असलेल्या कोणत्याही मुलाचे नाव किंवा वैयक्तिक तपशील प्रकाशित करण्यास प्रतिबंधित करते.
१. विशेष न्यायाधीश रेश्मी वॉल्टर यांनी २६ ऑगस्टच्या त्यांच्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपी पत्रकार आणि प्रकाशक यांनी त्यांच्या ९ एप्रिल २०१९ या दिवशीच्या ‘राजस्थान पत्रिका’ वृत्तपत्रात पीडितेचे नाव आणि छायाचित्र प्रकाशित करून या कायद्यांचे उल्लंघन केले, हे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष यशस्वी ठरला आहे.
२. वृत्तपत्राचे प्रकाशक आणि पत्रकार यांचे प्रतिनिधित्व करणार्या अधिवक्त्यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना सांगितले की, अल्पवयीन पीडितेचे छायाचित्र, नाव आणि त्यासोबतच वृत्तपत्र प्रकाशित करणे हे केवळ लहान मुले आणि महिला यांच्यावरील लैंगिक गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने होते. कायद्याचे उल्लंघन करण्याचा कोणताही हेतू नव्हता. आरोपींपैकी कुणावरही यापूर्वीचे कोणतेही गुन्हे नोंद नाहीत, असा युक्तीवाद करतांना अधिवक्त्यांनी सौम्य शिक्षेची विनंती केली.
३. एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या विनंतीवरून वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. ‘आयपीसी’चे कलम २२८ (अ) एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेने सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने विनंती केल्यास पीडित व्यक्तीची ओळख उघड करण्याची अनुमती देते, हा युक्तीवादही न्यायालयाने नाकारला.