Supreme Court : सर्वोच्‍च न्‍यायालयात ८३ सहस्र खटले प्रलंबित : आतापर्यंतची सर्वांत मोठी संख्‍या !

नवी देहली – देशातील सर्वोच्‍च न्‍यायालयात ८२ सहस्र ८३१ खटले प्रलंबित आहेत. सर्वोच्‍च न्‍यायालयातील आजपर्यंतच्‍या प्रलंबित प्रकरणांची ही सर्वांत मोठी संख्‍या आहे. एका वृत्तसंस्‍थेने प्रसिद्ध केलेल्‍या अहवालानुसार वर्ष २०२४ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयात ३८ सहस्र ९९५ नवीन खटले प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आले. त्‍यांपैकी ३७ सहस्र १५८ प्रकरणे निकाली काढण्‍यात आले. गेल्‍या १० वर्षांत प्रलंबित प्रकरणांची संख्‍या ८ पट वाढली आहे.

उच्‍च न्‍यायालयात ५९ लाख, तर कनिष्‍ठ न्‍यायालयांत ४ कोटी ५० लाख खटले प्रलंबित !

वर्ष २०१४ मध्‍ये उच्‍च न्‍यायालयात एकूण ४१ लाख खटले प्रलंबित होते, ते वर्ष २०२४ मध्‍ये ५९ लाख झाले आहेत. वर्ष २०१४ मध्‍ये कनिष्‍ठ न्‍यायालयांत २ कोटी ६० लाख खटले प्रलंबित होते, ते आता ४ कोटी ५ लाख झाले आहेत.

सर्वोच्‍च न्‍यायालयातील न्‍यायाधिशांच्‍या संख्‍येत दुपटीने वाढ !

वर्ष २००९ मध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयातील न्‍यायाधिशांची संख्‍या २६ वरून ३१ करण्‍यात आली; मात्र त्‍यानंतरही प्रलंबित प्रकरणांची संख्‍या अल्‍प झालेली नाही. २०१९ मध्‍ये सरन्‍यायाधीश रंजन गोगोई यांच्‍या कार्यकाळात सरकारने संसदीय कायद्यांतर्गत न्‍यायाधिशांची संख्‍या ३१ वरून ३४ पर्यंत वाढवली. यानंतरही प्रलंबित प्रकरणांची संख्‍या वाढतच गेली.

संपादकीय भूमिका 

सर्वोच्‍च न्‍यायालय, उच्‍च आणि कनिष्‍ठ न्‍यायालये येथे वर्षानुवर्षे खटले प्रलंबित रहाणे आणि त्‍यावर काही उपाययोजना न निघणे, हे लज्‍जास्‍पद होय ! सक्षम आणि जलद गतीने चालणारी न्‍याययंत्रणा मिळण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्रच हवे !