आज १५ ऑगस्ट, म्हणजे महर्षि अरविंदांचा जन्मदिवस अर्थात् जयंती ! एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात या भारतवर्षात दोन महर्षी होऊन गेले, एक महर्षि दयानंद सरस्वती आणि दुसरे महर्षि अरविंद ! या महान सशस्त्र क्रांतीकारकाची, तत्त्ववेत्याची, वेदांवरच्या एका भाष्यकाराची, एका बुद्धिमान आणि प्रगल्भ विद्वत्ता असलेल्या, राष्ट्रभक्तीपायी सनदी अधिकार्याच्या पदावर लाथ मारणार्या, ४ दशकांहूनही अधिक कालावधी विलक्षण ध्यानसाधना करणार्या एका सिद्ध अशा महायोग्याची आणि तप:पूत साधनेतून ३० सहस्रांहून अधिक पृष्ठांची ग्रंथनिर्मिती करणार्या एका सिद्धहस्त लेखकाची आज जयंती आहे, हेही अनेकांना ठाऊक नसावे, यात राष्ट्राचे दुर्भाग्य असले, तरी आश्चर्याचे असे काहीच नाही ! कारण दुर्भाग्याने इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात महर्षींचा संदर्भ एक-दोन वाक्यांतच गुंडाळल्याने आणि ज्या गांधी-नेहरूंच्या पलीकडे आमचा इतिहास जातच नाही, ती इतिहासाची पुस्तके वाचणार्या करंट्या आम्हा भारतियांना या दोन महर्षींचा इतिहास ठाऊक तरी कसा असावा ? एकावर १८ वेळा विषप्रयोग स्वकियांनीच केला, तर दुसर्यावर त्याची भाषा अतिशय जड असल्याने त्यांस आम्ही दुर्लक्षिले ! म्हणूनच त्यापैकी एका लोकोत्तर महर्षींच्या चरित्रचिंतनासाठीचा हा लेखनप्रपंच !
१. विदेशात राहूनही साधनेला प्रवृत्त होणारे क्रांतीकारी वृत्तीचे अरविंद !
अरविंद यांच्या पित्याने त्यांच्या पुत्राला भारतीय संस्कृतीचा गंधही लागू नये म्हणून वयाच्या ७ व्या वर्षीच युरोपात शिक्षणासाठी धाडले, त्याच मुलाने वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत तिथे सुटाबुटात राहूनही राष्ट्रनिष्ठेने भारावून जाऊन आय.सी.एस्.च्या नोकरीवर लाथ मारली. त्याला चमत्कार म्हणावा कि नियतीची योजना ? महर्षि अरविंद यांचा स्वभाव जात्याच क्रांतीकारकाचा असल्याने त्यांच्या ज्वलज्जहाल लेखणीने त्यांनी तत्कालीन काँग्रेस नेतृत्वावर जहाल टीका केली. वंगभंगाच्या आदोलनाने प्रेरित होऊनही त्याच्या विभाजनाने ते कष्टी झाले. त्यांनी महाराष्ट्रातही कार्य केले. त्यांचे आंग्लभाषेवरचे असामान्य प्रभुत्व पाहून बडोद्याचे महाराज सयाजीराव यांनी त्यांना जवळ केले !
२. साधनेस प्रवृत्त होणे आणि कारागृहात श्रीकृष्णाचा साक्षात्कार होणे !
हिंदुस्थानात परतल्यावर सागर किनार्यावरच त्यांना एक विलक्षण अनुभव आला. त्या वेळी ईश्वरावर विश्वास नसतांनाही त्यांना अनेक अनुभव आले. श्रीरामकृष्णांच्या चरित्राने प्रभावित होऊन ते कुतुहलाने साधनेस प्रवृत्त झाले. आरंभी ते नास्तिक होते. पुढे क्रांतीकारी कार्यामुळे इंग्रजांनी त्यांना कारावासात टाकले; पण तिथे गायत्री मंत्राच्या साधनेने आणि ध्यानधारणेने त्यांना श्रीकृष्णाचा साक्षात्कार झाला.
३. ‘राष्ट्रभक्ती म्हणजे राजकारण नव्हे’ आणि ‘सनातन धर्म हाच राष्ट्रधर्म’ असल्याने सनातन धर्माचा नाश झाल्यास राष्ट्राचा नाश होईल !
एका भाषणात महर्षि अरविंद म्हणतात, ‘‘आज मला जे काही बोलावयाचे होते, ते माझ्या डोक्यातून पार काढून टाकण्यात आले आणि त्याऐवजी जे तेथे ठेवण्यात आले, ते हे इतकेच. – सध्याची ही चळवळ खरी राजकीय चळवळ नव्हे आणि राष्ट्रभक्ती म्हणजे राजकारण नव्हे, तर तो एक श्रेष्ठ प्रतीचा धर्म आहे, ती एक निष्ठा आहे. सतत चालण्याचा तो एक शाश्वत मार्ग आहे. आज पुन्हा मी तेच सांगतो; परंतु जरा वेगळ्या रीतीने. पूर्वीप्रमाणे राष्ट्रभक्ती हा एक धर्म, मार्ग किंवा निष्ठा आहे, असे न म्हणता ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, तोच आपला राष्ट्र-धर्म आहे, असे मी म्हणतो. सनातन धर्म हा हिंदु राष्ट्राला जन्मजात मिळालेला आहे. या धर्माच्या वाढीसमवेत राष्ट्रही वैभवास चढते. धर्म आणि राष्ट्र यांची कायमची सांगड घालून दिली आहे. जेव्हा सनातन धर्माचा र्हास होऊ लागतो, तेव्हा त्याचसमवेत राष्ट्राचाही र्हास होऊ लागतो आणि जर सनातन धर्म नष्ट होणे शक्य असेल, तर सनातन धर्मासमवेत राष्ट्राचाही नाश होईल. सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म आहे.’’
४. सर्वस्व भारतमातेसाठी अर्पण करण्याचे युवकांना आवाहन !
महर्षि २३ ऑगस्ट १९०७ च्या बंगालच्या ‘नॅशनल कॉलेज’च्या एका भाषणात म्हणतात, ‘‘हीच वेळ आहे देशासाठी काहीतरी करण्याची आणि भारतमातेच्या सेवेपेक्षा अधिक काहीच श्रेष्ठ नाही ! भारतमातेसाठी तुम्ही ज्ञान प्राप्त करा. तुमचे शरीर, मन आणि आत्मा तिच्या सेवेसाठी अर्पण करा. तिच्यासाठी जीवन जगा. तुम्ही अशासाठी परदेशात जा, जेणेकरून परत येऊन तिच्यासाठी काही ज्ञान प्राप्त करून आणू शकाल. भारतमातेच्या समृद्धीसाठी काम करा.’’
५. छत्रपती शिवरायांना परमवंदनीय मानणारे महर्षि अरविंद !
लोकमान्य टिळकांच्या विनंतीमुळे ते महाराष्ट्रात आले. नाशिकमध्ये त्यांनी त्यांच्या मनात प्रचंड आदर असलेल्या छत्रपती शिवरायांवर छोटेसे भाषणही केले. ‘समग्र लोकमान्य टिळक’ या ग्रंथाच्या खंडांमध्येही महर्षि अरविंद यांची काही भाषणे आहेत. टिळकांच्या काही भाषणांचे संकलनही महर्षि अरविंद यांनी केले आहे.
६. वेदांवरचे भाष्य आणि महाकाव्य
भगिनी निवेदितांनी सांगितल्याप्रमाणे पुदुच्चेरी (पाँडेचरी) मध्ये कायमच्याच निवासाचा निर्णय घेतल्यावर महर्षींनी येथे ४ तपे योगसाधना केली. वेद, उपनिषदे, रामायणांवरचे त्यांचे भाष्यही येथेच पूर्ण केले. ‘सिक्रेट ऑफ दी वेदाज्’ या ग्रंथात महर्षींनी वेदांवर टीका करणारे स्वकीय आणि पाश्चात्त्य यांच्या विकृतींचे निराकरण ज्या पद्धतीने केले आहे, त्यामुळे आपण त्यांच्यापुढे नतमस्तक झाल्याविना रहात नाही. ‘सावित्री’ नावाचे जगातील सर्वांत भव्य असे आंग्लभाषेतील महाकाव्य महर्षींनी ४ दशके रचून पूर्णत्वास नेले. त्यात त्यांनी सावित्री आणि सत्यवान यांच्या रूपक कथेतून पूर्ण योगतत्त्वाचे चिंतन प्रकट केले आहे. महर्षि अरविंदांची भाषा कळण्यास कठीण वाटत असली, तरी त्यात जो प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार आणि शब्दवैभवाचा साक्षात्कार वाचकांना ठायी ठायी अनुभवायला येतो, तो निश्चितच अलौकीक आहे.
७. ४ दशकांहून अधिक योगसाधना
महर्षि योगी अरविंद म्हणतात, ‘‘वर्ष १९०४ मध्ये गुरूंविना मी योगाभ्यास करण्यास आरंभ केला. वर्ष १९०८ मध्ये एका महाराष्ट्रीय योग्याकडून मला महत्त्वपूर्ण साहाय्य मिळाले आणि माझ्या साधनेचे मूळ तत्त्व सापडले; माझी साधना आंतरिक अनुभवांवर आधारित होती. कारागृहात मी गीतेतील योगाचा अभ्यास केला आणि उपनिषदांच्या साहाय्याने ध्यान केले; पाँडिचेरी येथे वेदांचा अभ्यास चालू केल्यावर मला आधीच आलेल्या अनुभवांचे वर्णन वेदांत आढळून आले. कधी काही प्रश्न उद्भवल्यास अथवा अडचण आल्यास गीतावाचनाने मला उत्तर मिळत असे.’’
८. स्वातंत्र्यदिनानिमित्तचे त्यांचे अंतिम भाषण
वर्ष १९४७ मध्ये भारतवर्षांस स्वातंत्र्य मिळताच महर्षि अरविंदांनी मुक्त भारतवर्षाला दिलेल्या संदेशाचा गाभा पुढीलप्रमाणे होता, ‘‘प्रत्येक राष्ट्राचे एक जीवितकार्य असते आणि भारताचेही असे एक कार्य आहे आणि ते म्हणजे सर्व विश्वाला आध्यात्मिकता प्रदान करणे.’’ हा संदेश हा भारतवर्षाच्या भवितव्याविषयी त्यांचे आमूलाग्र चिंतन प्रकट करणारा आहे.
– श्री. तुकाराम चिंचणीकर (साभार : ‘पाखण्ड खण्डिणी’ या ब्लॉगवरून)