१५ ऑगस्ट या दिवशी असलेल्या भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने…
१ ते १५ ऑगस्ट १९४७ या १५ दिवसांमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. त्यांचे भारताच्या पुढील भविष्यावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. १४ ऑगस्ट या दिवशी भारताच्या इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींची माहिती येथे देत आहोत.
१. कोलकाता
सकाळची हवा आल्हाददायक आणि प्रसन्न असली, तरी तशी बलियाघाट भागात नव्हती. पसरलेल्या चिखलामुळे एक विचित्र प्रकारची घाण आसमंतात भरून राहिली आहे. म. गांधी हे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. अगदी शेजारचीच काही घरे त्यांना तुटक्या, फुटक्या आणि जळक्या अवस्थेत दिसतात. त्यांच्या समवेतचे कार्यकर्ते सांगतात, ‘परवाच्या दंगलीत मुसलमान गुंडांनी ही हिंदूंची घरे जाळली.’ गांधीजी थबकतात. विषण्ण नजरेने त्या घरांकडे बघतात आणि पुन्हा चालू लागतात. एक कार्यकर्ता अन्यांना सांगतो, ‘गांधीजींच्या सांगण्याप्रमाणे संपूर्ण कोलकाता शहरात ठिकठिकाणी हिंदु आणि मुसलमान यांचे संयुक्त मोर्चे निघत आहेत. काल दिवसभरात दंगलीची एकही बातमी नाही…!’
२. कराची – पाकिस्तान नावाचा देश अस्तित्वात येणे
सकाळचे ९ वाजत आहेत. साध्याशा वाटणार्या; पण भव्य अशा ‘असेंब्ली हॉल’मध्ये (सभागृहामध्ये) बरीच गडबड उडालेली आहे. काही क्षणातच येथे ‘पाकिस्तान’ अधिकृतरित्या अस्तित्वात येणार आहे. शंखाकृती आकाराच्या या सभागृहात पठाण, आफ्रिदी, वझीर, महसूद, पंजाबी, बलुची, सिंधी आणि बंगाली अशी विविध प्रकारची माणसे बसली आहेत. ही त्या त्या क्षेत्रातील पुढारी माणसे आहेत.
इंग्रज गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन हे नौसेना अधिकार्याच्या रूपातील संपूर्ण गणवेशात आहेत. या वेळी पाकिस्तानचे संस्थापक बॅरिस्टर जीना उपस्थित आहेत. याप्रसंगी भाषण करतांना माऊंटबॅटन म्हणाले, ‘पाकिस्तानचा उदय ही एक ऐतिहासिक घटना आहे. इतिहास कधी कधी एखाद्या हिमखंडाच्या गतीने संथपणे, तर कधी पाण्याच्या जोरदार प्रवाहासारखा सुसाट गतीने पुढे जात रहातो. आपण प्रवाहातील अडथळे दूर करून या घटनांच्या आवेगात स्वतःला झोकून देत आहोत. आता मागे पहाणे नाही. आता केवळ पुढेच बघायचे आहे.’
या वेळी जीना म्हणाले, ‘ब्रिटन आणि त्यांनी निर्माण केलेल्या वसाहती यांचे संबंध विच्छेद होतांनाही, परस्परांमधील स्नेहभाव जागा आहे. गेली १३ शतके अस्तित्वात असलेल्या आमच्या पवित्र इस्लामकडून इतर धर्मांबद्दलच्या सहिष्णुतेचे पालन केले जाईल, असे मी अभिवचन देतो. आमच्या शेजारील राष्ट्रांसोबत आणि जगातील इतरही राष्ट्रांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात पाकिस्तान कधीही मागे रहाणार नाही..!’ या भाषणानंतर पाकिस्तानचे पहिले ‘गव्हर्नर जनरल’ (राज्यपाल) म्हणून त्यांना शपथ घ्यायची होती. ती त्यांनी घेतली आणि अधिकृतपणे ‘पाकिस्तान’ नावाचे राष्ट्र उदयाला आले.
यानंतर एका सजलेल्या काळ्या, उघड्या टपाच्या ‘रोल्स राईस’ या चारचाकी मोटारीतून असेंब्ली हॉलपासून गव्हर्नर हाऊसपर्यंत, म्हणजेच आताच्या जीनांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक निघाली. रस्त्याच्या दुतर्फा चांगलीच गर्दी होती. सहस्रो लोक जीनांचा आणि पाकिस्तानचा जयजयकार करत होते.
३. श्रीनगर
सकाळचे १० वाजत आहेत. शहरातील मुख्य टपाल कार्यालय. कार्यालयाचे अधिकारी पाकिस्तानचा झेंडा लावत आहेत. तेथे उभे असलेले संघाचे २ स्वयंसेवक हे बघतात. ते तात्काळ ‘पोस्ट मास्तर’ला विचारतात, ‘तुम्ही पाकिस्तानचा झेंडा कसा काय लावला ? महाराजांनी (महाराजा हरि सिंग) काश्मीर हे पाकिस्तानात विलीन केलेले नाही.’ तो मुसलमान पोस्ट मास्तर शांतपणे उत्तर देतो, ‘श्रीनगरचे टपाल कार्यालय हे सियालकोट सर्कलच्या अंतर्गत येते आणि सियालकोट तर पाकिस्तानचा हिस्सा झाला आहे. म्हणून आम्ही पाकिस्तानचा झेंडा फडकवला.’’ हे दोघे स्वयंसेवक जम्मू-काश्मीरचे प्रांत संघचालक प्रेमनाथ डोग्रा यांना हे कळवतात. डोग्राजी तात्काळ महाराजांच्या कार्यालयातील उत्तरदायी अधिकार्यांना हे कळवतात आणि १०-१५ स्वयंसेवकांना मुख्य टपाल कार्यालयात पाठवतात. हे स्वयंसेवक ‘पोस्ट मास्तर’ला समजवतात आणि अवघ्या पाऊण घंट्यात पाकिस्तानचा झेंडा खाली येतो…!
४. सिंगापूर
सिंगापूरच्या ‘इंडियन इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन कमिटी’ने ‘मलायन एअरवेज’सह उद्याचा दिवस (१५ ऑगस्ट) साजरा करण्याची एक खास योजना आखली होती. ‘मलायन एअरवेज’चे एक विशेष विमान पडांगच्या ‘वाटरलू स्ट्रीट’वरून उड्डाण भरणार होते आणि ते ही नेमके तेव्हाच जेव्हा तिथे भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज फडकवण्याचा सोहळा साजरा होत असेल. या विमानात नेताजी सुभाषबाबूंच्या ‘आझाद हिंद सेने’चे शिपाई आणि अधिकारी, ‘रानी झांसी रेजिमेंट’च्या महिला सैनिक अन् बालसेनेचे कार्यकर्ते असणार होते. हे सर्व ध्वजारोहण प्रसंगी विमानातून पुष्पवृष्टी करणार होते; मात्र ‘आझाद हिंद सेने’चे नाव घेताच सिंगापूरच्या ‘नागरी उड्डाण विभागा’ने या विशेष कार्यक्रमावर हरकत घेतली आणि उड्डाणालाच अनुमती नाकारली…! आता ‘इंडियन इंडिपेंडेंस डे सेलिब्रेशन कमिटी’ही उद्या वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची योजना आखत आहे.
५. कराची
दुपारचे ४ वाजत आहेत. कराचीतील एका मोठ्याशा हवेलीत की, जो संघाशी संबंधित असलेला परिवार आहे, त्यांच्या घराच्या छतावर ‘राष्ट्र सेविका समिती’च्या सेविकांच्या एकत्रिकरणाचा कार्यक्रम ठेवला आहे. या कार्यक्रमाला कराची शहरातील हिंदूबहुल वस्त्यांमधून ७०० हून सेविका आल्या असतील. वातावरण गंभीर असले, तरी उत्साही आहे. शाखा लागते. ध्वज लागतो. मनाची उमेद वाढवणारे आणि आत्मविश्वास देणारे गीत होते. एक तरुण सेविका प्रश्न विचारते, ‘आमची अब्रू धोक्यात आहे. आम्ही काय करावे ? कुठे जावे ?’ समितीच्या प्रमुख मावशी त्यांच्या आश्वासक स्वरात सांगतात, ‘जमेल तसे हिंदुस्थानात या. मुंबईला आणि इतरत्र तुमची व्यवस्था केलेली आहे. चिंता करू नका. आपण सर्व म्हणजे एक परिवार आहोत. ही वेळ ही निभावून नेऊ. धैर्यशाली बना. धीर धरा. स्वतःच्या अब्रूचे रक्षण करा. आपल्या संघटनेवर पूर्ण विश्वास ठेवा. आपल्या मातृभूमीच्या सेवेचे व्रत या कठीण काळातही चालू ठेवा. आपल्या संघटनेच्या शक्तीवर आपण या कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर पडू.’
६. बेलियाघाट, कोलकाता
गांधींची सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ झालेली आहे. समोर असलेल्या १० सहस्रांहून अधिक जमलेल्या जमावापुढे गांधी शांतपणे बोलू लागले, ‘सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे अभिनंदन ! कोलकातामध्ये तुम्ही हिंदु आणि मुसलमान भेद मिटवला, हे फार छान झाले. उद्यापासून आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होणार; मात्र त्यासह आज रात्रीपासून आपला हा देशसुद्धा विभाजित होणार. म्हणूनच उद्याचा दिवस जसा आनंददायक तसाच दुखःदायकही आहे. जर का एकदा जातीय वैमनस्याच्या ज्वाळांनी हा देश वेढला, तर आपले हे नवीन मिळालेले स्वातंत्र्य तरी टिकेल का ? उद्याचा स्वातंत्र्यदिन मला वैयक्तिकरित्या आनंदी करू शकत नाही, हे सांगतांना मला फार दुःख होत आहे. माझ्या सर्व अनुयायांना माझे हेच सांगणे असेल की, उद्या २४ घंट्यांचे उपोषण करा, प्रार्थनेत वेळ घालवा आणि चरख्यावर सूत कताई करा. यामुळेच आपला देश वाचू शकेल.’
७. देहली
अ. संध्याकाळचे ६ वाजत आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा बंगला. जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातील नेहरू सोडून बहुतांश मंत्री उपस्थित आहेत. या बंगल्याच्या आवारात येऊ घातलेल्या स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी यज्ञ चालला आहे. वेदविद्येत नामांकित असलेले आचार्य यज्ञ करवून घेत आहेत. बाहेर संथ लयीत पाऊस पडत आहे. वातावरण एका प्रसन्न आणि पवित्र भावनेने भरून गेलेले आहे.
आ. रात्रीचे १० वाजत आहेत. ‘स्टेट कौन्सिल बिल्डींग’मध्ये ‘संविधान सभे’चे सर्व सदस्य, मंत्रीगण, वरिष्ठ अधिकारी जमा होत आहेत. गोल आकाराच्या त्या सभागृहाच्या बाहेर पावसाची पर्वा न करता सहस्रो लोक उभे आहेत. पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. आंबेडकर, बलदेव सिंह, नेहरू, राजकुमारी अमृत कौर हे मंत्री एका पाठोपाठ एक येत आहेत. ‘वन्दे मातरम्’, ‘म. गांधी की जय’च्या घोषणा देत आहेत. सभागृहातील उच्च आसनावर सभागृहाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद बसले आहेत. त्यांच्या डावीकडे खालच्या बाजूला लॉर्ड माऊंटबॅटन पूर्ण सैनिकी पोषाखात आहेत. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी सभेचा प्रारंभ केला. त्यांनी सर्व ज्ञात-अज्ञात सैनिक आणि स्वातंत्र्यवीर यांचे स्मरण केले. त्यानंतर नेहरूंनी भाषण केले.
यानंतर बरोबर १२ वाजता त्या सभागृहात बसलेल्या आणि गांधी टोपी घातलेल्या एका सदस्याने त्याच्या समवेत आणलेल्या मोठ्या शंखाने शंखनाद केला. त्या शंखध्वनीने तेथे उपस्थित प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. एक नवा इतिहास घडत होता. एका नवीन युगाचा प्रारंभ होत होता. भारत स्वतंत्र झालेला होता..!
८. गव्हर्नर हाऊस, कोलकाता
रात्रीचा १ वाजत आला आहे. तिकडे देहलीत सत्तांतरणाचा कार्यक्रम पार पडत असतांनाच इकडे इंग्रजांच्या जुन्या राजधानीत, म्हणजेच कोलकातामध्ये एक नवा अध्याय लिहिला जात आहे. गव्हर्नर हाऊसमध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा राज्यपाल (गव्हर्नर) म्हणून शपथ घेण्याचा १० ते १५ मिनिटांचा लहानसा कार्यक्रम चालू होत होता. मावळते गव्हर्नर, सर फेड्रिक बरोज हे राजगोपालाचारी यांना स्वतःची सूत्रे देत आहेत. राजगोपालाचारी यांनी इंग्रजीतून शपथ घेतली; मात्र नवनियुक्त मुख्यमंत्री डॉ. प्रफुल चंद्र घोष आणि त्यांचे इतर मंत्री यांनी बंगाली भाषेत शपथ घेतली. आजपर्यंत जे गव्हर्नर हाऊस समस्त भारतियांच्या, विशेषतः क्रांतीकारकांच्या, मुळावर उठले होते, तेथे लोकांना जोरजोरात ‘वन्दे मातरम्’ची घोषणा देतांना एक वेगळाच थरार सर्वांना जाणवत आहे.
स्वतंत्र भारतावर सूर्य अजून उगवलेलाही नसतांना स्वतंत्र देशाच्या पहिल्या सार्वजनिक कार्यक्रमाचा समारोप हा असा झाला…!
– श्री. प्रशांत पोळ, राष्ट्रचिंतक, लेखक आणि अभियंता, जबलपूर, मध्यप्रदेश. (श्री. प्रशांत पोळ यांच्या फेसबुकवरून साभार)