भारतीय संस्कृतीतील धार्मिक जीवन !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

१२ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु माणसाच्या अंतःकरणातील धर्मकल्पना विकसित होणे महत्त्वाचे, जगद्गुरु शंकराचार्यांनी जाणलेले मर्म आणि हिंदु धर्माचे माहात्म्य वर्णन करणारी उद्बोधक वचने’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.         (लेखांक ३५)

भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/823610.html

प्रकरण ६

४. धर्माची व्याप्ती आणि महत्त्व 

धर्मानुसार वागणे हितावह आहे. धर्माचा आधार ‘वेद’ असून परमेश्वरच धर्माचा उद्गाता आणि त्राता आहे. मूर्ख लोक अधर्मालाच ‘धर्म’ म्हणतात. ऐहिक आणि पारलौकिक कल्याण धर्मानेच साध्य होते. त्यासाठीच धर्म हा प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा २ प्रकारचा आहे.

५. धर्म कसा आहे ?

परमेश्वर धर्मरक्षणार्थ अवतार घेतो. या कोणत्याही वचनांत ‘हिंदु धर्म’ हा शब्द नाही; कारण ईश्वरनिर्मित आणि सर्व विश्वातील, सर्वांसाठी असणारा धर्म एकच आहे. त्याला नाव नाही. धर्म हेच त्याचे नाव ! धर्म वैदिक सनातन म्हणजे प्राचीन आहे; पण नित्य, नवा असा शाश्वत ! धर्म कसा ? वेदांतून सांगितला गेलेला. धर्म कसा ? मानवधर्म. सर्व मानवांसाठी असलेला. धर्म कसा ? ईश्वरी म्हणजे ईश्वराने निर्माण केलेला. धर्म कसा ? आर्यधर्म, म्हणजे सज्जन लोक ज्याचे आचरण करतात तो ! धर्म कसा ? सिंधुनदीच्या पलीकडील हिंदू लोक ज्याचे आचरण करतात तो. हिंदू शब्द अलीकडचा आहे.

६. हिंदु धर्माचे संस्थापक कोण ?

ख्रिस्ती, इस्लाम, झोराष्ट्र, ज्यू यांच्या सापेक्षतेने भिन्नत्व दाखवणारा हा शब्द आहे; परंतु व्यक्तीविशेषाने निर्माण केलेला, स्थापन केलेला, तो पंथ असतो. संप्रदाय असतो. त्यामुळे संस्थापकापूर्वी त्याचे अस्तित्व नसते, हे उघड आहे. अशा कोणत्या व्यक्तीचे नाव आपण हिंदु धर्मात संस्थापक म्हणून सांगू शकू ? अडीच सहस्र वर्षांपूर्वी शंकराचार्य झाले. ते नंबुद्री ब्राह्मणच होते, म्हणजे धर्म आधीच होता. श्रीकृष्णपरमात्म्याने गीता सांगितली, त्याला ५ सहस्र वर्षे झाली. त्यापूर्वी श्रीरामांचा जन्म सहस्रो वर्षे आधीचा ! त्यांच्या जन्मापूर्वी दशरथाने यज्ञ केला, म्हणजे धर्म त्यामागचा. वेदग्रंथ किती जुने कुणास ठाऊक ! त्यात हा धर्म सांगितलेला आहे. त्यांचा कुणीही कर्ता नाही. ‘ऋषयः मन्त्रद्रष्टारः न तु मन्त्रकर्तारः  ।’ म्हणजे ‘ऋषि हे मंत्रद्रष्टे आहेत, मंत्रांचे कर्ते नाहीत.’

७. ‍विज्ञान आणि ज्ञान !

अ. वेदांतील सिद्धांत वैज्ञानिक प्रगती आणि संशोधक यांनी बाधित झालेले नसून उलट विज्ञानाचे अंतिम निर्णय वेदांतच आढळतात. विज्ञान हे प्रायोगिक आहे.

आ. ज्ञान सैद्धांतिक आहे.

इ. विज्ञान गतीमान आहे. ज्ञान स्थितीमान आहे.

ई. विज्ञान सदैव पालटत असते. ज्ञान कधी पालटत नाही. पालटणे हे विज्ञानाचे लक्षण, तर न पालटणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. किंबहुना विज्ञान जेव्हा न पालटण्याच्या अवस्थेला पोचते, तेव्हा तेच ज्ञान होय. या परिपूर्ण ज्ञानावरच सनातन वैदिक हिंदु धर्म प्रस्थापित झालेला आहे.

– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.

(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)