Hindenburg Row : भारतात आर्थिक अराजकता आणण्‍याचे षड्‌यंत्र ! – रविशंकर प्रसाद, भाजपचे खासदार

हिंडेनबर्गच्‍या आरोपांवर भाजपची टीका !

भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद

नवी देहली – ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्‍थेने १० ऑगस्‍ट या दिवशी भारतातील शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणार्‍या सेबी संस्‍थेवर केलेल्‍या आरोपावर भाजपने प्रश्‍न उपस्‍थित केले आहेत. ‘भारतात आर्थिक अराजकता निर्माण करण्‍याचे षड्‌यंत्र रचण्‍यात आले आहे’, अशी टीका भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद यांनी केले आहे. ते येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद म्‍हणाले की,

१. भारतातील जनतेने नाकारल्‍यानंतर देशात आर्थिक अराजकता आणि अस्‍थिरता आणण्‍यासाठी काँग्रेस आणि तिचे मित्रपक्ष यांचे षड्‌यंत्र आहे; कारण १० ऑगस्‍ट या दिवशी हिंडेनबर्गचा अहवाल घोषित झाला आणि ११ ऑगस्‍टला देशात गदारोळ झाला. १२ ऑगस्‍टला शेअर बाजार अस्‍थिर झाला.

२. भारत एक सुरक्षित, स्‍थिर आणि आशावादी बाजारपेठ आहे. या बाजारावर लक्ष ठेवणे हे ‘सेबी’चे कायदेशीर दायित्‍व आहे. जुलैमध्‍ये सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या देखरेखीखालील अन्‍वेषणानंतर ‘सेबी’ने हिंडेनबर्गला नोटीस बजावली, तेव्‍हा त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट निराधार आरोप केले.

३. हिंडेनबर्गमध्‍ये गुंतवणूक कुणाची आहे ? जॉर्ज सोरोस हे एक गृहस्‍थ आहेत, जे नियमितपणे भारताविरुद्ध अपप्रचार करतात. ते हिंडेनबर्गमध्‍ये मुख्‍य गुंतवणूकदार आहेत, हे लक्षात घ्‍यायला हवे.

४. भारताचा शेअर बाजार अडचणीत आला, तर छोटे गुंतवणूकदार त्रस्‍त होतील; मात्र काँग्रेसला याची चिंता नाही. काँग्रेसला संपूर्ण शेअर बाजार उद़्‍ध्‍वस्‍त करायचा आहे. लहान गुंतवणूकदारांची भांडवली गुंतवणूक थांबवायची आहे आणि भारतात आर्थिक गुंतवणूक होणार नाही याचा प्रयत्न करायचा आहे.