ग्रामसभेत वेर्णा पठारावरील प्रस्तावित कचरा प्रकल्पालाही विरोध
मडगाव, ११ ऑगस्ट (वार्ता.) – वेर्णा पठारावर ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास लोटली पंचायतीच्या ११ ऑगस्ट या दिवशी झालेल्या ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला. ‘सनबर्न’मध्ये अमली पदार्थांचा वापर होत असून हे युवा पिढीसाठी घातक आहे’, असे मत ग्रामस्थांनी ग्रामसभेत व्यक्त केले. अखेर तरुणांच्या भवितव्यासाठी वेर्णा पठारावर ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास विरोध दर्शवणारा ठराव ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्रामसभेत वेर्णा पठारावर प्रस्तावित कचरा प्रकल्पाला विरोध आणि कोकणी रोमी लिपीला देवनागरीबरोबर समान दर्जा देण्याची मागणी करणारे ठरावही संमत करण्यात आले. ग्रामसभेत ‘सनबर्न’चे आयोजन, कचरा प्रकल्प आणि रोमी लिपी यांसंबंधी प्रश्न हाताळण्यात येणार असल्याने ग्रामसभेला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.
‘सनबर्न’ला केवळ वेर्णा किंवा लोटली गावांतच नव्हे, तर गोव्यात कुठेही या महोत्सवाला अनुमती देऊ नये, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ग्रामसभेनंतर पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केल्या.
वेर्णा पठारावर ‘सनबर्न’चे आयोजन करण्याचा अर्ज आला नाही ! – आमदार आलेक्स रेजिनाल्ड, अध्यक्ष, औद्योगिक विकास महामंडळ
वेर्णा पठारावर औद्योगिक विकास महामंडळाच्या भूमीत ‘सनबर्न’चे आयोजन करण्यासंबंधी अर्ज आपल्याकडे आलेला नाही. मी स्वत: ‘सनबर्न’च्या विरोधात आहे; मात्र लोक विनाकारण माझ्या विरोधात टीका करतात. किटल येथे ‘सनबर्न’चे आयोजन करण्याचा प्रस्ताव मंडळाने यापूर्वी फेटाळला आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. आमदार आलेक्स रेजिनाल्ड पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक औद्योगिक वसाहतीत एक कचरा प्रकल्प असावा, असा नियम आहे आणि यानुसार वेर्णा येथे कचरा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र लोकांना विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ. प्रकल्पाविषयी अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.’’