UAE Warns Pakistanis : स्‍वतःचा देश, राजकारणी आदींच्‍या विरोधात नकारात्‍मक प्रचार केल्‍यास कारावासाची शिक्षा केली जाईल !

संयुक्‍त अरब अमिरातची त्‍यांच्‍या देशात येणार्‍या पाकिस्‍तानी नागरिकांना चेतावणी

कराचीतील संयुक्त अरब अमिरातीचे महावाणिज्यदूत डॉ. बखित अतिक अल्-रेमिथी

कराची (पाकिस्‍तान) : संयुक्‍त अरब अमिरातीच्‍या कराचीतील महावाणिज्‍यदूत बखित अतिक अल्-रेमिथी यांनी त्‍यांच्‍या देशामध्‍ये रहाणार्‍या पाकिस्‍तानी लोकांना  स्‍वतःचा देश, तेथील संस्‍था किंवा राजकारणी यांच्‍या विरोधात नकारात्‍मक प्रचार टाळण्‍यास सांगितले आहे. अशा लोकांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. अमिरातमध्‍ये १८ लाख पाकिस्‍तानी रहातात.

१. अल्-रेमिथी यांनी सांगितले की, संयुक्‍त अरब अमिरातमध्‍ये रहाणार्‍या किंवा भेट देणार्‍या पाकिस्‍तानी लोकांकडून सामाजिक माध्‍यमांवर पाकिस्‍तानविरोधात नकारात्‍मक प्रचार केला जात आहे, ज्‍यासाठी अनेकांना अटक करण्‍यात आली असून  त्‍यांना १५ वर्षांची शिक्षा सुनावण्‍यात आली आहे. ५ हून अधिक पाकिस्‍तानींना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावण्‍यात आली, तर बहुतेकांना हद्दपार करण्‍यात आले. अशा पाकिस्‍तानींना संयुक्‍त अरब अमिरातचा व्‍हिसा (देशात रहाण्‍यासाठीची अनुमती) मिळणार नाही आणि ते तिथे जाऊ शकणार नाहीत.

२. पाकिस्‍तानमध्‍ये काही लोक इम्रान खान यांच्‍या बाजूने आहेत, तर काही लोक नवाझ शरीफ यांच्‍या बाजूने आहेत. काही लोक सैन्‍याच्‍या बाजूने, तर काही लोक सैन्‍याच्‍या विरोधात आहेत. हे लोक जेव्‍हा संयुक्‍त अरब अमिरातमध्‍ये जातात, तेव्‍हा ते स्‍वतःचे मत उघडपणे मांडतात. पाकिस्‍तानमधील राजकीय मतभेद संयुक्‍त अरब अमिरातपर्यंत पोचू नयेत, अशी अमिरातची इच्‍छा आहे.