हरिद्वार (उत्तराखंड) – कावड यात्रा २६ जुलैला हरिद्वार शहराच्या ज्वालापूर भागातून जाणार होती; मात्र त्यापूर्वीच या मार्गावरील २ मशीद आणि १ मजार (मुसलमानाचे थडगे) यांच्या समोर पडदे लावून ते झाकण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाला ही माहिती मिळताच प्रशासनाने ‘आम्ही अशा प्रकारे पडदे लावण्याचे कोणतेही निर्देश दिले नव्हते’, असे सांगत ते सर्व पडदे काढले.
१. यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे. यामागे कुठलाही चुकीचा हेतू नव्हता.
२. या संदर्भात पालकमंत्री सतपाल महाराज म्हणाले की, कावड यात्रेच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, तसेच यात्रा सुखरुप पार पडावी, यासाठी मशीद आणि मजार यांच्यासमोर पडदे लावण्यात आले होते. यामागे दंगल भडकवण्याचा उद्देश नव्हता.