मंदिराच्या वास्तूतील स्थुलातील भाग आणि त्यांच्याशी संबंधित गुरुकृपायोगातील अष्टांग साधना !

गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी करावयाची साधना म्हणजे ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ !

गुरुकृपायोगानुसार साधनेची व्यष्टी साधना (वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न) अन् समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीचे प्रयत्न), अशी दोन अंगे आहेत. व्यष्टी साधना आणि समष्टी साधना हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे २ प्रकार आहेत.

पाया जितका घट्ट आणि भक्कम असतो, त्यावर एखाद्या वास्तूचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्यानुसार स्वभावदोष आणि अहं निमूर्लनाद्वारे अंतर्शुद्धी साधल्यास साधनेच्या भक्कम पायावर साधनेचे मंदिर उभे रहाते. हा विषय दर्शवणारे लिखाण आणि त्यासंबंधीचे चित्र बाजूला दिले आहे.

गुरुकृपायोगानुसार केलेली साधना मंदिराच्या पायापासून टप्प्याटप्प्याने कळसापर्यंत, म्हणजे ईश्वरप्राप्तीपर्यंत कशी नेते, हे पुढील सारणीवरून लक्षात येईल.

टीप – पायापासून भिंतींपर्यंतचा दगडी बांधकामाचा भाग

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

गुरुकृपायोगाचे माहात्म्य

१. गुरुकृपायोगाचा अर्थ

‘कृपा’ हा शब्द ‘कृप्’ या धातूपासून निर्माण होतो. ‘कृप्’ म्हणजे दया करणे आणि ‘कृपा’ म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद !

गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, म्हणजेच जिवाला ईश्वरप्राप्ती होणे, याला ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात.

२. गुरुकृपायोगाची निर्मिती आणि स्थिती

२ अ. निर्मितीचा काळ : ‘सात्त्विकतेचा र्‍हास होत गेल्याने, म्हणजेच रज आणि तम यांच्या प्रभावामुळे प्राप्त साधनामार्ग न पेलवल्यामुळे एका साधनामार्गाचा लोप होत जाऊन त्यातून निर्माण होणार्‍या दुसर्‍या साधनामार्गाला स्थान प्राप्त होत जाण्यापर्यंतचा मधला ‘शून्यकाळ’, म्हणजेच ‘कलहकाल’ !

प्रत्येक युगातील कलहकालामध्ये, म्हणजे शून्यकालामध्ये कलहामुळे धर्माचे पालन होत नाही. धर्माधिष्ठितता नष्ट झाल्यामुळे धर्मसंस्थापना करण्यासाठी परमेश्वराला अवतार घ्यावा लागतो. त्यामुळेच प्रत्येक युगाच्या कलहकालात ‘गुरुकृपायोग’ साकारतो.

२ आ. कालावधी : युगाच्या सात्त्विकतेनुसार गुरुकृपायोगाचा कालावधी अल्प-अधिक अशा प्रमाणात निश्चित असतो.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावानेही लिखाण करतात. ६.१.२००६, रात्री ८.२५)

३. महत्त्व

निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे वाया न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची, ते गुरुकृपायोग शिकवतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने आध्यात्मिक उन्नती शीघ्रगतीने होते.

३ अ. आध्यात्मिक उन्नतीनुसार योगमार्गात होत जाणारा पालट आणि गुरुकृपायोगाचे महत्त्व

३ अ १. ‘कर्मकांड : ५० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळी असलेले कर्मकांडानुसार साधना करतात.

३ अ २. भक्तीयोग : ५० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकामध्ये पूजाविधीतून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीलहरी पेलवण्याची क्षमता निर्माण झाल्याने आणि त्याच्या आंतरिक चैतन्यातच हळूहळू वृद्धी होऊ लागल्याने त्याला उपासनेसाठी बाह्य गोष्टी वापरण्याची आवश्यकता उरत नाही. त्यानंतर हळूहळू तो प्रत्यक्ष कर्मकांडातून उपासनाकांडाकडे, मानसपूजेकडे प्रवास करू लागतो, म्हणजेच खर्‍या भक्तीयोगाचा पुरस्कर्ता होतो.

३ अ ३. ज्ञानयोग : एकदा का भावाचे आलंबन जमू लागले की, त्याचा ज्ञानयोगात प्रवेश होतो.

३ अ ४. गुरुकृपायोग (सहजयोग) : त्यानंतर निराकार प्रकाशातील चैतन्याच्या आलंबनामुळे तो गुरुकृपायोगात किंवा सहजयोगात प्रवेशतो.’

– एक विद्वान (श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ ‘एक विद्वान’ या नावानेही लिखाण करतात. २१.१०.२००५, रात्री ८.५०)

३ आ. ‘गुरुकृपायोग’ हा अक्षय्य आनंदाची अनुभूती देणारा कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांचा त्रिवेणी संगम असणे

‘गुरुकृपायोग’ हा कर्मयोग, भक्तीयोग आणि ज्ञानयोग या योगांचा त्रिवेणी संगम आहे, म्हणजेच तीन योगांचा काला आहे. याची चव चाखणे, म्हणजे गुरुकृपायोगाद्वारे अक्षय्य आनंदाची अनुभूती घेणे होय. त्यामुळे ‘गुरुकृपायोग’ हा परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांसाठी दिलेला गोपाळकाल्याचा प्रसाद होय.’

– (सद्गुरु (डॉ.) चारुदत्त प्रभाकर पिंगळे यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, सकाळी ७.५५ ते ८.०५)

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – ‘शीघ्र ईश्वरप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोग’ : खंड २)