पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह ९ जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद !

  • ‘वाईन शॉप’चा परवाना देत असल्याचे सांगून फसवणूक
  • सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
प्रतिकात्मक चित्र

पाचगणी (सातारा) – थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर (जिल्हा सातारा) येथे हेमंत साळवी या हॉटेल व्यावसायिकाला १ कोटी ५० लाख रुपयांना फसवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे पथकातील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह ९ जणांवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (पुणे विभाग) आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक देवश्री मोहिते यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद प्रविष्ट (दाखल) केली आहे. (गुन्हा नोंद झाला तरी निलंबित का केले नाही ? – संपादक)

राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील पुणे पथकातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापुरे यांच्यासह हनुमंत मुंडे, विवेक पंडित, नीलेश पटेल, अभिमन्यू देडगे, राजन सोनवणे, शकील सय्यद, नजमा शेख आणि बाळू पुरी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापुरे, मुंडे आणि पंडित यांनी तक्रारदार यांना ‘वाईन शॉप’ (मद्य विक्रीचे दुकान) परवाना मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संजय साळुंखे यांच्या मध्यस्थीने वेळोवेळी १ कोटी ५० लाख रुपये स्वीकारले.