धनाच्या सर्व प्रकारांमध्ये विद्याधन हेच सर्वश्रेष्ठ !

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

प्रश्न : धनानां स्यात् किं उत्तमम् ?

अर्थ : श्रेष्ठ प्रकारचे धन कोणते ?

उत्तर : श्रुतम् ।

अर्थ : ज्ञान (हेच श्रेष्ठ धन आहे.).

ज्ञान किंवा विद्या हे धनाच्या सर्व प्रकारांमध्ये श्रेष्ठ प्रकाराचे धन आहे. भर्तृहरीने त्याच्या ‘नीतीशतका’त ही गोष्ट फार चांगल्या रितीने प्रतिपादन केली आहे. भर्तृहरि म्हणतो, ‘विद्या हे अशा प्रकारचे धन आहे की, जे चोराला चोरून नेता येत नाही. त्याच्या वाटणीसाठी भाऊबंदकी माजत नाही. वाहून नेतांना त्याचे ओझे होत नाही आणि हे विद्याधन दान केले, तर न उणावता उलट वाढतेच. म्हणून विद्याधन हेच सर्व धनांमध्ये श्रेष्ठ मानले पाहिजे. पूर्वी ग्रंथांची उपलब्धता फारशी नसल्याने ते श्रवणाच्या द्वारे मिळवावे लागत असे; म्हणून त्याला ‘श्रुत’ म्हटले आहे. मुद्रणाच्या प्रसाराच्या काळातही ज्ञानाचे श्रवण हे साधन पूर्णपणे नष्ट करता आलेले नाही. तसे करता आले असते किंवा तसे करणे इष्ट असते, तर विद्यालये-महाविद्यालये चालवण्याचे प्रयोजनच राहिले नसते. म्हणून आजही ज्ञानाला ‘श्रुत म्हणणे’ यथार्थच आहे. पैसा नष्ट होतो, श्रीमंती चंचल आहे. श्रीमंतीमुळे मिळणारी प्रतिष्ठा स्थलकाळाच्या दृष्टीने मर्यादित होते; पण ज्ञानाचे तसे नाही. ज्ञानवंताच्या प्रतिष्ठेला आणि मानमान्यतेला स्थलकाळाची बंधने रहात नाहीत. महर्षि व्यास, शंकराचार्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि अनेक संशोधक यांच्यासारख्या विद्वत्तेचा प्रभाव सहस्रके अन् शतके उलटली, तरी जो जो काळ लोटतो आहे, तो तो वाढतोच आहे.

माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठी विद्याधन किंवा ज्ञानसंपत्ती यांचाच उपयोग व्हावयाचा असतो. तेच माणसाचे वैशिष्ट्यही आहे आणि भूषणही आहे.

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले)

(साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)