साधनेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणार्‍या कै. पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल !

साधारण ६ – ७ वर्षांपूर्वी मी कोची, केरळ येथे सेवेसाठी जायला लागल्यावर तेथील सेवाकेंद्रात रहाणार्‍या श्रीमती सौदामिनी कैमल (अम्मा) यांच्याशी माझी ओळख झाली. नंतर मी त्यांच्या पुष्कळ संपर्कात होते, असे नाही, तरीही मला त्यांच्याविषयी पुष्कळ जवळीक वाटायची. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.

कै. पू. (श्रीमती) सौदामिनी कैमल

१. प्रेमाने काळजी घेणे आणि कुटुंबियांची विचारपूस करणे 

सौ. मधुवंती पिंगळे

मी सेवाकेंद्रात गेल्यावर पू. श्रीमती सौदामिनी कैमल (अम्मा) माझी सर्वतोपरी काळजी घ्यायच्या.  मध्ये मध्ये भ्रमणभाष करून त्या माझी विचारपूस करायच्या. त्या माझी मुलगी सौ. वैदेही गौडा आणि जावई श्री. गुरुप्रसाद गौडा (आध्यात्मिक पातळी अनुक्रमे ६२ टक्के आणि ६५ टक्के) यांची आठवणही काढत असत.

२. साधनेची तळमळ

२ अ. दिवसभरात व्यष्टी साधनेचे प्रयत्न पूर्ण करणे : पू. अम्मा प्रतिदिन पहाटे ४ वाजता उठून नामजप करत. ‘दिवसभरात व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न पूर्ण व्हायला हवेत’, अशी त्यांची तळमळ असे. एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर त्यांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग लाभला होता. त्यांच्याशी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांच्या प्रक्रियेबद्दल बोलणे झाल्यानंतर अम्मा नियमितपणे स्वभावदोष सारणीचे लिखाण करत असत.

२ आ. रुग्णाईत असूनही नामजप करणे : फेब्रुवारी २०२४ मध्ये त्या पुष्कळ रुग्णाईत होत्या, तरी त्या ध्यानमंदिरात बसून नामजपादी उपाय पूर्ण करायच्या. ‘नामजप करत असतांना त्या अनुसंधानात आहेत’, असे मला जाणवायचे.

 २ इ. प्रतिदिन भावजागृतीसाठी केलेले प्रयत्न संतांचे आज्ञापालन म्हणून भावसत्संगात सांगणे : त्या प्रतिदिन सकाळी ‘ऑनलाईन भावजागृती सत्संगा’ला नियमित उपस्थित रहायच्या. सत्संगात प्रतिदिन जे ध्येय दिले जायचे, त्यानुसार ‘स्वतः कोणते प्रयत्न केले ?’, हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांचे बोलणे ऐकतांना कर्तेपणा न जाणवता ‘गुरुदेव माझ्याकडून कसे प्रयत्न करून घेत आहेत’, अशी कृतज्ञता आणि साधनेची तळमळ व्यक्त होत असे. ‘सर्वकाही गुरुदेवांची इच्छा आहे आणि तेच सर्व करत आहेत’, असा त्यांचा भाव असे. त्यांचे प्रयत्न ऐकणार्‍या अन्य साधकांनाही उत्साह वाटत असे.

‘भावसत्संगांमध्ये साधकांनी आपण केलेल्या प्रयत्नांविषयी सांगायला हवे’, असे सदगुरु डॉ. पिंगळेकाका यांनी सांगितले होते. त्यांचे आज्ञापालन म्हणून प्रतिदिन सत्संगामध्ये त्या सर्वप्रथम स्वतः केलेल्या प्रयत्नांविषयी सांगत असत. यातून ‘संतांचे आज्ञापालन कसे करावे ?’, हा त्यांचा गुण लक्षात आला. ‘सद्गुरु पिंगळेकाकांच्या सत्संगाचा कसा लाभ होतो’, याविषयीही त्या मला नेहमी सांगायच्या.

२ ई. सेवेची तीव्र तळमळ

१. पू. अम्मांचे वय झाल्यामुळे त्यांना अनेक शारीरिक त्रास होत असत. त्यांचे गुडघेही दुखत असत, तरीही अनेक वर्षे त्यांनी सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात सेवा केली. ‘गुरुदेवांनी शक्ती दिली आहे, तोपर्यंत सेवा करायची’, असा त्यांचा विचार असे.

२. गुरुपौर्णिमेसाठी अर्पण घेण्याची सेवाही त्या करत असत. त्या त्यांचे नातेवाईक आणि परिचित व्यक्ती यांच्याकडून अर्पण मिळवत. ‘शारीरिक स्थिती चांगली नाही’, असे म्हणून त्यांनी कधीही सेवेत सवलत घेतली नाही.

३. ‘साधकांची अध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे

केरळ येथे साधकसंख्या अल्प आहे. सर्व साधक तळमळीने सेवा करतात. ‘काही साधकांना आध्यात्मिक त्रास असूनही ते सर्व सेवा करतात. त्यामुळे तेथील साधकांची आध्यात्मिक प्रगती लवकर व्हावी’, असे त्या सतत म्हणत असत.

४. त्या सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे स्मरण करून त्यांच्या अनुसंधानात रहायच्या. त्या नेहमी गुरुदेवांची महती सांगत असत. 

प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे मला श्रीमती कैमलअम्मा यांच्याकडून ‘चिकाटी’, ‘तळमळ’, ‘भाव’, ‘प्रेमभाव’ इत्यादी गुण शिकण्याची संधी मिळाली. यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे, मंगळूरू, कर्नाटक. (१०.७.२०२४)

(हे लिखाण कै. (श्रीमती) सौदामिनी कैमल या संत होण्यापूर्वीचे असल्याने त्यांचा उल्लेख ‘पू.’ असा केलेला नाही.)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.