Muharram by Hindus : कर्नाटकातील कुष्टगी तालुक्यातील मुसलमान नसलेल्या गावांत हिंदूंकडून साजरा केला जात आहे मोहरम !

कोप्पळ (कर्नाटक) – कोप्पळ जिल्ह्यातील कुष्टगी तालुक्यातील कुरबनाळ, नागराळ आणि काही इतर गावांमध्ये एकही मुसलमान रहात नसतांना तेथे हिंदूंकडून मोहरम साजरा केला जात आहे. यातील कंदकुरू गावात एक मशीदही बांधण्यात आली आहे. गावातील दोटीहाळ कुटुंब मोहरम साजरा करत आहे. ही परंपरा गेल्या १०० वर्षांपासून चालू आहे. हनुमंत देव, बसवण्णा, शरणबसव आणि तायम्मा देवी अशी या कुटुंबातील लोकांची नावे आहेत.

(म्हणे) ‘ही परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श ठरावी, अशी आमची इच्छा !’ – गावकरी

या कुटुंबाने सांगितले की, सर्व गावांमध्ये लोक मोहरममध्ये सहभागी होत असले, तरी आमच्या गावातील लोकसुद्धा अशा सणांपासून वंचित राहू नयेत; म्हणून संपूर्ण गावाचे लोक एकत्र येऊन मोहरम भक्तीभावाने साजरा करतात. येथे आजोबा आणि पणजोबा यांच्या काळापासून चालत आलेली परंपरा चालू आहे. देव एकच आहे, सर्व धर्मातील संत, सत्पुरुष मानव जातीच्या उद्धारासाठी आहेत. सर्व धर्मांचे सार एकच आहे; म्हणून आम्ही धर्म विसरून मोहरमसह सर्व सण भक्तीने साजरे करतो. ही परंपरा भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श ठरावी, अशी आमची इच्छा आहे.

जुनी मशीद केली जात आहे दुरुस्त !

येथील जुनी झालेली मशीद दुरुस्त केली जात असून तिचा खर्च सर्व गावकरी करत आहेत. मोहरमच्या कालावधीत होणार्‍या खर्चासाठी गावातील लोक आर्थिक क्षमतेनुसार  देणगी देत आहेत, अशी माहिती धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणारे राजासाब दोटीहाल यांनी दिली. मुसलमान नसल्यामुळे आमच्या पूर्वजांच्या काळापासून या गावात मोहरम साजरा करण्यासाठी आमचे कुटुंब सहकार्य करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोहरमच्या दिवशी हिंदूंच्या प्रत्येक घरातील लोक मशिदीत जाऊन अल्लाला  फुलांची माळ आणि साखर अर्पण करतात. अनेक लोक अल्लाला केलेला नवस पूर्ण करतात. गावभर मिरवणूक काढली जाते. नागराळ गावातही मुसलमान कुटुंब नसतांनाही तेथे मोहरम जोरात साजरा केला जातो आणि सर्व गावकरी तो ‘गावकर्‍यांचा सण’ म्हणून साजरा करतात.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचा परिणाम ! उद्या अशा हिंदूंनी धर्मांतर केले, तरी आश्‍चर्य वाटणार नाही !
  • जेथे मुसलमान मोहरम साजरा करत आहेत आणि मिरवणुका काढत आहेत, तेथे काही ठिकाणी हिंदूंवर आक्रमण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातून तरी हिंदू शहाणे होतील का ?