Suvendu Adhikari : ‘सबका साथ और सबका विकास’ आणि अल्‍पसंख्‍यांक मोर्चा बंद करा !

बंगालमधील भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी यांचे कार्यकर्त्‍यांना आवाहन !

भाजपचे नेते शुभेंदू अधिकारी

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील भाजपचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांनी ‘सबका साथ और सबका विकास’ याची आम्‍हाला आवश्‍यकता नाही. आम्‍हाला (हिंदूंना) साथ देणार्‍यांना आम्‍ही साथ देऊ. आम्‍ही निवडणूक जिंकू आणि हिंदूंना वाचवू’, असे विधान केले. ते पक्षाच्‍या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी अधिकारी यांनी भाजपची ‘अल्‍पसंख्‍यांक मोर्चा’ ही शाखा बंद करण्‍याची मागणी केली. ‘सबका साथ और सबका विकास’ ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.

शुुभेंदू अधिकारी यांनी राज्‍यातील पोटनिवडणुकीत भाजपच्‍या पराभवाचे कारण सांगितले. ते म्‍हणाले, ‘‘पोटनिवडणुकीत सहस्रो हिंदूंना मतदान करू देण्‍यात आले नाही. लोकसभा निवडणुकीतही लाखो हिंदूंना मतदान करू दिले नाही; कारण आपण हिंदु आहोत. यापुढे मतदानाच्‍या वेळी (हिंदूंनी मतदान करू नये; म्‍हणून) सकाळपासून आपल्‍या घरासमोर जिहादी बसलेले असतील. पोलीस प्रेक्षक होतील. आपण जागे झाले पाहिजे. येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्‍या घटकपूर आणि भंगार येथे हिंदूंना मतदान करू दिले नाही. बदुरिया, हरोआ आणि कॅनिंग वेस्‍ट येथे तृणमूल काँग्रेसने दीड लाख मतांनी विजय मिळवला. तेथे मतदार कार्डद्वारे मतदान झाले नाही. स्‍लिपद्वारे मतदान झाले. आम्‍हाला बंगालमध्‍ये लोकशाही हवी आहे. धनेखली, केशपूर, इंदास, पत्रसैर, शितलाकुची येथे हिंदूंना मतदान करू दिले नाही. निवडणुकीच्‍या दिवशी मला गुंडांनी घरात कोंडून ठेवले. केंद्रीय सुरक्षा दलांना मतदार कार्ड पहाण्‍याचा अधिकार द्यावा, अशी आमची इच्‍छा आहे. बंगालमध्‍ये राज्‍यघटना संपली आहे. आम्‍हाला राज्‍यघटना वाचवायची आहे.’’

शुभेंदू अधिकारी यांनी मतदारांसाठी प्रारंभ केले संकेतस्‍थळ !

शुभेंदू अधिकारी यांनी या वेळी एका संकेतस्‍थळाचेही (‘पोर्टल’चेही) लोकार्पण केले. त्‍यांनी सामाजिक माध्‍यमांतून लिहिले की, मी वचन दिल्‍याप्रमाणे, मी एक पोर्टल चालू केले आहे. या पोर्टलवर ज्‍या मतदारांना मतदान करण्‍याची अनुमती नाही, ते त्‍यांच्‍या तक्रारी यावर नोंदवू शकतात. अशा लोकांच्‍या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली जाईल.

  • मी जे बोललो, ती बंगालमधील वस्तूस्थिती ! – शुभेंदू अधिकारी यांचे स्पष्टीकरण

  • पंतप्रधान मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेशी संबंध नसल्याचे केले स्पष्ट !

शुभेंदू अधिकारी यांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकारांशी बोलतांना शुभेंदू अधिकारी म्हणाले की, माझे विधान पंतप्रधान मोदी, पक्ष आणि केंद्र सरकार यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या घोषणेशी जोडू नये. मी जे बोललो, ती बंगालमधील वस्तूस्थिती आहे. राज्यातील एकाही मुसलमानाने भाजपला मतदान केलेले नाही. हिंदूंनी जागे होण्याची आवश्यकता आहे; कारण बंगाल हाताबाहेर जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत अनेक जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येचे प्रमाण पालटले आहे. अनेक ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक, तर मुसलमान बहुसंख्यांक झाले आहेत. मी माझ्या भागात गेल्यावर हिंदू असो कि मुसलमान, प्रत्येकाला विकास योजनांचा लाभ देतो. तरीही ‘भाजप हिंदूंचा पक्ष आहे’, असे म्हटले जाते. आम्ही सर्वांसाठी काम करतो, आमच्या सरकारने ज्या काही योजना आणल्या आहेत, त्या सर्वांसाठी आहेत. मी जे मांडले आह, ते माझे वैयक्तिक मत आहे. जे काही खरे आहे, ते मी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • बंगालमध्‍ये तृणमूल काँग्रेसच्‍या राज्‍यात ‘मुसलमानांना साथ आणि मुसलमानांचा विकास’ केला जात आहे, त्‍यांना पाठीशी घातले जात आहे; कारण मुसलमान तृणमूलला एकगठ्ठा मतदान करत आहे. अशा वेळी बंगालमध्‍ये ‘सबका साथ नाही..’ चालणार नाही, तर भाजपला हिंदूंचीच साथ लागणार आहे !
  • नुकत्‍याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपला मुसलमानांची मते मिळाली नाहीत आणि हिंदूंच्‍या मतांमुळेच भाजप पुन्‍हा सत्तेवर येऊ शकला, हे भाजपवाल्‍यांना आता स्‍पष्‍ट झाल्‍यामुळेच त्‍यांचे नेते थेट असे विधान करू लागले आहेत !