महोत्सवात अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याच्या घटनाही सत्य असल्याचा दावा
पणजी, १६ जुलै (वार्ता.) – ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक’ महोत्सव गेली अनेक वर्षे वागातोर येथे होत आहे. ‘सनबर्न’ महोत्सव चालू असलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत नाही; पण महोत्सवात सहभागी होणारे अमली पदार्थ घेऊन आतमध्ये येतात. महोत्सव काळात अमली पदार्थांचे अतीसेवन केल्याने मृत्यू झाल्याच्या घटनाही सत्य आहेत, अशी स्वीकृती भाजपचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. (यावरून या महोत्सवात संगीताची आवड असणारे नव्हे, तर अमली पदार्थांची नशा करणारे, दारूडे आदी गैरवागणूक करणारे सहभागी होतात. असे पर्यटक असणे हा गोवा राज्याला कलंक असल्यामुळे सनबर्न महोत्सवावर बंदी घालणेच आवश्यक आहे. – संपादक)
विधानसभा संकुलाच्या बाहेर पत्रकारांशी बोलतांना आमदार मायकल लोबो यांनी ही माहिती दिली. ‘सनबर्न’च्या आयोजकांनी यंदाचा महोत्सव दक्षिण गोव्यात होणार असल्याचे घोषित केले आहे आणि याला दक्षिण गोव्यातून तीव्र विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मायकल लोबो यांचे हे विधान समोर आले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘सनबर्न’ महोत्सवाला एकाच वेळी सुमारे ७० सहस्र लोक उपस्थित असतात. एवढ्या लोकांची प्रवेशाच्या वेळी तपासणी करणे कठीण आहे. ‘सनबर्न’च्या परिसरात अमली पदार्थ घेऊन येणार्यांवर अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलीस यांनी कारवाई करणे आवश्यक आहे. दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ झाला पाहिजे कि नाही ?, हे तेथील लोकांना ठरवावे लागेल. दक्षिण गोव्याच्या तुलनेत उत्तर गोव्यात ‘नाईट क्लब’सारखे मनोरंजनात्मक उद्योगक्षेत्र अधिक प्रमाणात कार्यरत आहे आणि यामुळे ‘सनबर्न’ उत्तर गोव्यात होत असतो. उत्तर गोव्यात ‘सनबर्न’चे आम्ही नेहमी स्वागत केले आहे. ‘सनबर्न’मुळे गोव्यात पर्यटक अधिक प्रमाणात येतात आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योगाला अधिक चालना मिलते.’’