‘सनबर्न’ महोत्सवाला दक्षिण गोव्यात तीव्र विरोध

‘सनबर्न’ महोत्सवाला अजूनही अनुमती न दिल्याचा सरकारचा दावा

पणजी, १३ जुलै (वार्ता.) – डिसेंबर महिन्याच्या अखेर गेली अनेक वर्षे वागातोर येथे होणारा ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक्स डान्स फेस्टिवल’ यंदा दक्षिण गोव्यात २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे आयोजकांनी घोषित केल्यानंतर महोत्सवाला दक्षिण गोव्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. ‘सनबर्न’ महोत्सव दक्षिणेत घेण्यास कार्यकर्ते, नागरिक आणि राजकीय पक्ष विरोध करत आहेत. विरोधी पक्षांचे आमदार संघटितपणे दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास विरोध करत आहेत. १५ जुलैपासून चालू होणार्‍या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. दक्षिणेत ‘सनबर्न’च्या आयोजकांनी अनुमतीसाठी ‘गोवा मनोरंजन सोसायटी’ला संपर्क साधल्याचे समजते; मात्र आयोजकांनी अजूनही पर्यटन खात्याला संपर्क केलेला नाही.

पर्यटन खात्याचे संचालक सुनील अंचिपाका म्हणाले, ‘‘सनबर्न’च्या आयोजकांनी खात्याला अजूनही संपर्क केलेला नाही.’’ मंत्री सुभाष फळदेसाई पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारला काही निर्णय घ्यावे लागतात. दक्षिण गोव्यातील जनतेला सनबर्न महोत्सव नको असल्यास सरकार त्यासंबंधी योग्य निर्णय घेईल.’’

दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ महोत्सवाला विरोध

आमदार वेन्झी व्हिएगस म्हणाले, ‘‘उत्तर किंवा दक्षिण गोव्यात आम्हाला कुठेही ‘सनबर्न’ महोत्सव झालेला नको. आम्हाला अमली पदार्थाचा व्यवसाय आणि वेश्याव्यवसाय नको आहे. गोव्याची कायदा आणि सुव्यवस्था अगोदरच बिघडलेली आहे.’’ (गेल्या वर्षी सनबर्नला ऐनवेळी सरकारी अनुमती मिळून तो महोत्सव झाला. त्या वेळी व्हिएगस कुठे होते ? – संपादक)

‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई म्हणाले, ‘‘दक्षिणेत होणार्‍या विरोधाचा दाखला देत भाजप सरकार उत्तर गोव्यात ‘सनबर्न’चे आयोजन करणार आहे.’’ (आमदार विजय सरदेसाई माजी मुख्यमंत्री दिवंगत पर्रीकर यांच्या सरकारमध्ये असतांनाही हा महोत्सव झाला होता. त्याचे काय ? – संपादक)

सामाजिक कार्यकर्त्या आवडा व्हिएगस म्हणाल्या,‘‘सनबर्न’ महोत्सव ही आपली संस्कृती नव्हे. दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ नको.’’ अधिवक्ता राधाराव ग्रासियस म्हणाले, ‘‘सनबर्न’ दक्षिण गोव्यातील शांततामय जीवनाला आणि सर्वांसाठी धोकादायक आहे. याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरणार.’’ (अधिवक्ता राधाराव ग्रासियस सनबर्न दक्षिण गोव्यात येणार म्हटल्यावर जागे झाले; कारण दक्षिण गोव्यात ख्रिस्त्यांची संख्या अधिक आहे. उत्तर गोव्यातील लोकांनी विरोध केला, त्या वेळी त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती. याविषयी त्यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

अधिवक्ता क्लिओफात कुतिन्हो म्हणाले, ‘‘आमदार, पंचायती आणि बिगर सरकारी संस्था यांनी या महोत्सवाला विरोध केला पाहिजे.’’ वन्यजीव संरक्षक पूजा मित्रा म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारच्या महोत्सवांनी स्थानिक अधिवासावर आणि जैवविविधतेवर न भरून येण्याजोगा प्रभाव टाकला आहे. वागातोर पठारावर भेट दिल्यास त्याचे परिणाम दिसून येतील. गोवा हे एक जागतिक पातळीवरील जैवविविधतेचे स्थळ असल्याने सरकारने निसर्गावर आधारित पर्यटनावर भर द्यावा.’’

‘सनबर्न’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंह यांनी शब्द पालटला !

सनबर्नला हिंदु जनजागृती समिती आणि पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते यांचा होणारा विरोध पाहून ‘सनबर्न’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंह यांनी गतवर्षी ‘यंदाचा ‘सनबर्न’ शेवटचा असेल’, अशी घोषणा केली होती; मात्र आता मुख्य कार्यकारी अधिकारी करण सिंह यांनी दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’चे आयोजन करण्यास उत्साह वाटत असल्याचे म्हटले आहे. करण सिंह म्हणाले, ‘‘सनबर्न’ दक्षिण गोव्यात नवीन अध्याय चालू करत आहे. ‘सनबर्न’चे नवीन स्थळ संस्मरणीय राहील, अशी आशा आहे. जगभरातील प्रेक्षक दक्षिण गोव्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेतील, अशी आशा आहे.’’

संपादकीय भूमिका 

  • यापूर्वीच्या महोत्सवात अनेक जणांचे अमली पदार्थांमुळे मृत्यू झाले आहेत. हिंदु जनजागृती समिती कित्येक वर्षांपासून या महोत्सवाला वैध मार्गांनी विरोध करत आहे. त्या वेळी दक्षिणेतील एकाही आमदाराने याची नोंद घेतली नाही किंवा पाठिंबा दिला नाही. आता भाजप शासनाला विरोध दर्शवण्यासाठी हे राजकीय नाटक आहे का ? अशी शंका कुणाला आल्यास चुकीचे ठरणार नाही.
  • विरोधात असलेले दक्षिणेतील राजकारणी सत्तेत असते, तर त्यांनी सनबर्न आयोजित केला नसता का ?