लंडनमधील वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच !

  • विधानसभेत सांस्‍कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

  • १९ जुलै या दिवशी भारतियांना वाघनखे सातारा येथे पहाता येणार !

मुंबई, ११ जुलै (वार्ता.) – इंग्‍लंडमधील ‘व्‍हिक्‍टोरिया अल्‍बर्ट म्‍युझियम’मध्‍ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज यांचीच आहेत. याच वाघनखांनी त्‍यांनी अफझलखानाचा कोथळा काढला, असे सांगून सांस्‍कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘वाघनखे छत्रपती शिवरायांची आहेत कि नाहीत ?’ या वादाला शासनाच्‍या वतीने पूर्णविराम दिला. १९ जुलै या दिवशी राज्‍यशासनाच्‍या सातारा येथील संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवण्‍यात येणार आहेत.

१. इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन ‘व्‍हिक्‍टोरिया अल्‍बर्ट म्‍युझियम’मध्‍ये असलेली वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्‍याचे वक्‍तव्‍य केले होते. भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी सरकारने याविषयी निवेदन सादर करण्‍याचे आवाहन केले होते.

म्‍युझियममध्‍ये असलेली वाघनखे

२. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, ‘‘म्‍युझियममध्‍ये असलेली वाघनखे छत्रपती शिवरायांचीच असल्‍याचे काही संदर्भ शिवप्रेमींनी शासनाला दिले आहेत. म्‍युझियमच्‍या संकेतस्‍थळावरही ही वाघनखे शिवरायांचीच असल्‍याचे संदर्भ देण्‍यात आले आहेत. १८ व्‍या शतकातसुद्धा ही वाघनखे छत्रपती शिवरायांची असल्‍याची वृत्ते ब्रिटनमधील वर्तमानपत्रांमध्‍ये प्रसिद्ध झाली होती. ही वाघनखे मिळावीत, यासाठी महाराष्‍ट्र शासनाने भारताचे पंतप्रधान, ब्रिटनचे पंतप्रधान आणि ‘व्‍हिक्‍टोरिया अल्‍बर्ट म्‍युझियम’ यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला. प्रथम ही वाघनखे भारताकडे १ वर्षासाठी सुपुर्द करण्‍यात येणार होती; मात्र त्‍यानंतर ती ३ वर्षांसाठी देण्‍याचा निर्णय ‘व्‍हिक्‍टोरिया अल्‍बर्ट म्‍युझियम’ने घेतला आहे. विरोधी पक्षातील नेत्‍यांमधील ९९ टक्‍के जणांनीही ही वाघनखे शिवरायांचीच असल्‍याचे मान्‍य केले आहे. त्‍यांना याविषयी शंका असेल, त्‍यांनी राज्‍यशासनाशी संपर्क करावा.’’

शिवकालीन शस्‍त्रास्‍त्रांच्‍या संग्रहालयाचे उद़्‍घाटन होणार !

१९ जुलै या दिवशी सातारा येथील संग्रहालयात सर्व शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांच्‍या वाघनखांचे दर्शन घ्‍यावे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज, सरदार आणि त्‍यांचे वंशज यांना निमंत्रित करण्‍यात आले आहे. या वेळी शिवकालीन शस्‍त्रांचे प्रदर्शन भरवण्‍यात येणार आहे. या संग्रहालयाचे उद़्‍घाटनही या वेळी होणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मंत्र्यांकडून शंकांचे निरसन !

‘छत्रपती शिवरायांची वाघनखे आणण्‍यासाठी मोठ्या प्रमाणात भाडे देण्‍यात आले, अशी चर्चा झाली; मात्र वाघनखे आणण्‍यासाठी एकही पैशाचे भाडे देण्‍यात आलेले नाही आणि यासाठी कुणी भाडे मागितलेही नाही. वाघनखे आणण्‍यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्‍यय झाल्‍याचे म्‍हटले गेले; मात्र एका दिवसाच्‍या जाण्‍या-येण्‍याचा १४ लाख ८ सहस्र रुपये इतकाच व्‍यय झाला आहे. वाघनखे ठेवण्‍यासाठी ७ कोटी रुपये व्‍यय येणार आहे, असे म्‍हटले जात आहे; मात्र हा व्‍यय ज्‍या ठिकाणी शिवकालीन शस्‍त्रास्‍त्रे ठेवण्‍यात येणार आहेत, त्‍या संग्रहालयाच्‍या डागडुजाचा व्‍यय आहे. वर्ष २०२३ हे शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाचे ३५० वे वर्ष नसल्‍याचे म्‍हटले गेले. याचा अभ्‍यास करूनच वर्ष २०२३ मध्‍ये २ ते ६ जून या कालावधीत शिवरायांचा ३५० वा राज्‍याभिषेक साजरा करण्‍यात आला होता. वर्ष २०२४ हे शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाचे ३५१ वे वर्ष आहे’, असे मुनगंटीवार म्‍हणाले.

लवकरच छत्रपती शिवरायांच्‍या राज्‍याभिषेकाची पुस्‍तिका प्रसिद्ध करणार !


छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे आदर्श राजे होते. शिवराज्‍याभिषेकाच्‍या निमित्ताने त्‍यांची थोरवी सर्वसामान्‍यांपर्यंत पोचवण्‍याचे काम आम्‍ही केले. लवकरच शिवराज्‍याभिषेकाची माहिती देणारी पुस्‍तिका शासनाकडून प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे, अशी माहिती या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.