रत्नागिरी – विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्वांचेच दायित्व आहे. ती सर्वांनी प्राधान्याने पार पाडावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे आदींसह पालक आणि शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी मागील बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केला. परिवहन विभागामार्फत जिल्ह्यातील विविध शाळांना रस्ता सुरक्षा विषयक करण्यात आलेले प्रबोधन, अल्पवयीन वाहन चालकांची तपासणी करून केलेली कारवाई, मद्यपान करून वाहन चालवणार्या चालकांची केलेली तपासणी, तसेच जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये केलेले रस्ता सुरक्षा विषयक प्रबोधन, तसेच जिल्ह्यातील काही शाळांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक चिन्हांची माहिती असणार्या स्कूल बॅगचे विद्यार्थ्यांना केलेल्या वाटपाची माहिती त्यांनी दिली.
पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि पालक यांना पुढील सूचना केल्या. सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करून सदरची माहिती अद्ययावत करावी आणि त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात. राज्य परिवहन महामंडळाने शाळांच्या मागणीनुसार शाळा भरणे आणि सुटण्याच्या वेळी एस्.टी. बसेसची व्यवस्था करावी. सर्व शाळांनी शाळेच्या सर्व परिसरांमध्ये ‘सीसीटीव्ही’ यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत प्रयत्न करावेत. शालेय वाहतुकीच्या तक्रारीसंदर्भात उप प्रादेशिक परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत जारी करण्यात आलेले हेल्पलाईन नं. (०२३५२)२२९४४४ आणि भ्रमणभाष क्र. ८२७५१०१७७९ या क्रमांकावरती तक्रार करावी, तसेच पोलीस विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या ११२ या ‘टोल फ्री’ क्रमांकावरती न घाबरता गुन्ह्याची माहिती दिल्यास पोलीस तात्काळ आपल्या साहाय्याला उपलब्ध होतील. तरी नागरिकांनी न घाबरता सदर क्रमांकावरती तक्रार करावी.
खासगी प्रवासी वाहनातून विद्यार्थी वाहतूक, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांची पोलीस विभाग आणि परिवहन विभाग यांनी तपासणी करून कारवाई करावी.