Women Candidates Loksabha : मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा महिला खासदारांची संख्या ४ ने घटली !

महिला उमेदवार कंगना राणावत व डिंपल यादव

नवी देहली – लोकसभा निवडणुकीत देशात ७४ महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ७८ महिला उमेदवार विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी ४ महिला खासदार अल्प झाल्या आहेत. एकूण ५४३ सदस्य संख्या असलेल्या लोकसभेमध्ये निवडून आलेल्या महिलांची संख्या ७४ म्हणजे १३.६३ टक्के होते. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर महिलांसाठी ३३ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ते लक्षात घेता, आताची महिला सदस्यसंख्या निश्‍चितच फार अल्प आहे. विशेष म्हणजे वर्ष १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ २२ महिला खासदारांची निवड झाली होती.

१. आताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये १४ राजकीय पक्षांच्या महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. त्यामध्ये भाजपच्या ३१, काँग्रेस १३, तृणमूल काँग्रेस ११, समाजवादी पक्ष  ५, द्रविड मुन्नेत्र कळघम् ३, लोक जनशक्ती पक्ष २ आणि संयुक्त जनता दल २ अशी संख्या आहे. तसेच ७ पक्षांच्या प्रत्येकी एकेक महिला खासदार संसदेत निवडल्या गेल्या आहेत. एकूण निवडल्या गेलेल्या सदस्यांपैकी महिलांच्या सदस्य संख्येचे प्रमाण काढले असता तृणमूल काँग्रेसच्या ३७.९३ टक्के, काँग्रेसच्या १३.१३ टक्के, तर भाजपच्या १२.९२ टक्के महिला खासदार निवडल्या गेल्या आहेत.

२. निवडल्या गेलेल्या ७४ महिला खासदारांपैकी ४३ सदस्य पहिल्यांदाच संसदेत जाणार आहेत. संसदेतील सदस्यांच्या वयाची सरासरी काढली असता ती ५६ वर्षे आहे. एकूण महिला सदस्यांच्या वयाची सरासरी काढली असता, ती ५० वर्षे आहे. एकूण महिला सदस्यांपैकी ७८ टक्के महिलांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

महिला उमेदवारांचे प्रमाण

वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण ८ सहस्र ३६० उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये केवळ १० टक्के महिला उमेदवार होत्या. वर्ष १९५७ च्या दुसर्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ ३ टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या. या वेळी पहिल्यांदाच निवडणुकीतील महिला उमेदवारांच्या संख्येने १० टक्क्यांचा आकडा पार केला आहे. संपूर्ण देशभरातील भाजपच्या एकूण उमेदवारांपैकी १६ टक्के महिला उमेदवार होत्या. त्याच निकषावर काँग्रेसच्या १३ टक्के महिला उमेदवार रिंगणात होत्या.