आध्यात्मिक पाया असलेली आणि साधनेने सुसंस्कारित झालेली मुलेच एक उत्तम राष्ट्र घडवण्यासाठी साहाय्यक ठरतील !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अनमोल विचारधन !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. लहान मुलांवर साधनेचे संस्कार करणे

१ अ. मुलांकडून नामजप करवून घेणे

१. ‘लहान मुलांना केवळ ‘नामस्मरण कर’, असे सांगून चालणार नाही, तर आरंभी त्यांच्या समवेत स्वतः बसून ‘नामस्मरण कसे करायचे ?’, हे त्यांना दाखवायला हवे.

२. मुलांना नामजपाची सवय लागेपर्यंत त्यांच्या समवेत बसून नामजप करावा.

३. ‘मुलांकडून एखादा नामजप सलग १ – २ घंटे करवून घ्यायचा’, असे न करता मुलांच्या कलाने आणि त्यांना झेपेल, इतका त्यांच्याकडून नामजप करवून घ्यावा.

४. मुलांना सलग बसण्यात अडचण असल्यास त्यांचे दिवसाचे नियोजन करून त्यांना १५-१५ मिनिटे बसवून त्यांच्याकडून जप करवून घ्यावा.

१ आ. सेवा करतांना भावाची जोड द्यायला शिकवणे : मुलांच्या कुवतीनुसार त्यांना लहान-सहान सेवा द्याव्यात. त्यांना ‘त्या सेवा योग्य रितीने कशा करायच्या ? सेवेला भाव कसा जोडायचा ?’, हे शिकवावे. त्यांना लहानपणापासूनच प्रत्येक कृतीला भाव जोडता येऊ लागला की, पुढे त्यांना देवाच्या अनुसंधानात रहाणे कठीण जाणार नाही.

१ इ. स्वावलंबन शिकवणे : ‘मुले करणार नाहीत. काम वाढवून ठेवतील’, या विचारांनी आपणच त्यांना स्वावलंबी बनवण्यात अल्प पडतो. काही वेळा मुलांना ओरडावेही लागते आणि एखादा धपाटाही द्यावा लागतो. आपल्या मुलांची प्रकृती, त्यांची आवड-निवड आणि त्यांच्या स्वभावातील गुण-दोष, असा सर्व बाजूंनी अभ्यास करून त्यांच्याशी वागावे. मुलांना कधीही मानसिक पातळीवर हाताळू नये. आरंभी कष्ट होतात; पण मुले एकदा का सिद्ध झाली, तर त्यांचे पुढचे आयुष्य चांगले घडते आणि तुम्हालाही त्यांचा आधार वाटेल.

२. मुलांना घडवण्यात आई-वडिलांचे असलेले दायित्व

मुलांवर संस्कार करून त्यांना घडवण्याचे सर्वात मोठे दायित्व मुलांच्या आई-वडिलांचे असते. लहानपणापासूनच आपल्या मुलांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण देऊन जागरूक बनवायला हवे. मुलांच्या लहानपणी त्यांच्यावर केलेले संस्कार त्यांना आयुष्यभर उपयोगी पडतात. आध्यात्मिक पाया असलेली आणि साधनेने सुसंस्कारित झालेली मुलेच ‘सुसंस्कृती’ आणतील अन् एक उत्तम राष्ट्र घडवण्यासाठी साहाय्यक ठरतील.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.