Cyclone Remal : बंगालमध्ये ताशी १३५ कि.मी. वेगाने धडकले ‘रेमल’ चक्रीवादळ !

झाडे, घरे आणि विजेचे खांब कोसळले

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या समुद्रकिनार्‍यावर ‘रेमल’ या चक्रीवादळाने धडक दिली. ताशी १३५ कि.मी. वेगाने वारे घोंघावत होते. या वेळी जोरदार पाऊस पडला. यामुळे किनारी भागांची हानी झाली. झाडे उन्मळून पडली, घरे कोसळली, तसेच विजेचे खांबही उन्मळून पडले. सुंदरबनमधील गोसाबा परिसरात एक जण घायाळ झाला. वादळ येण्यापूर्वी बंगालच्या किनारी भागातील अनुमाने १ लाख १० सहस्र लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. यांतील बहुतांश लोक दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांची प्रत्येकी १६ पथके किनारी भागात तैनात आहेत.

इंडिगो एअरलाइनने सांगितले की, रेमल वादळामुळे बागडोगरा, गौहत्ती, दिब्रुगढ, जोरहाट, दिमापूर, इम्फाळ, आगरतळा, रांची आणि दुर्गापूर येथील विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी उड्डाणाच्या वेळा तपासाव्यात.

कोलकाताचे महापौर फिरहाद हकीम यांनी सांगितले की, उंच आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये रहाणार्‍या लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. वादळानंतरच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी १५ सहस्र लोकांना तैनात करण्यात आले आहे. उन्मळून पडलेली झाडे तातडीने हटवली जात आहेत.