मुंबईत ठिकठिकाणी संथ गतीने मतदान; मतदान प्रक्रियेत अडथळे !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला मुंबईतील ६ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. अनेक ठिकाणी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या; मात्र काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होणे, मतदानसूचीत गोंधळ झालेला असणे, वीजपुरवठा खंडित होणे, मतदान संथगतीने केले जाणे यांमुळे मतदान प्रक्रियेत पुष्कळ अडथळे आले. काही ठिकाणी तर ४ ते ५ घंटेही मतदारांना ताटकळत रहावे लागले. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, तसेच वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्तींसाठी चाकांच्या आसंदीची (‘व्हीलचेअर’ची) सोय नव्हती. (मूलभूत गरजाही पूर्ण न करणारे असंवेदनशील प्रशासन काय कामाचे ! – संपादक )

१. बोरिवली येथे मतदान केंद्रावरील यंत्रे बिघडली.

२. मतदान संथ गतीने होत असल्याने ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे माहीममध्ये परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः आले होते.

३. मानखुर्द, मुलुंड आणि भांडुप येथे मतदान प्रक्रियेत तांत्रिक अडथळे आले.

४. भांडुप खिंडीपाडा परिसरातील मतदान केंद्रावरील विद्युत्पुरवठा खंडित झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली. अर्ध्या घंट्याहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित असल्याने मतदान बंद पडले होते.

५. घाटकोपर आणि विक्रोळी येथील काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

६. भिवंडी येथेही काही अडचणींमुळे नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले.

७. कल्याण येथे मतदानसूचीत नाव नसल्याने काही मतदारांना मतदान न करताच परतावे लागले.

८. भांडुप येथे ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांनी मतदारांना दाखवण्यासाठी कागदाने सिद्ध केलेली यंत्रे ठेवली होती. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

९. भायखळा येथील एका मतदान केंद्रावर एकूण ७६ ते ८६ असे दहा मतदान सूची क्रमांक आहेत. पुष्कळ गर्दी झाल्याने मतदारांना त्यांची रांगेची विचारपूस करावी लागत होती. काही जण चुकीच्या रांगेत उभे होते. घाईघाईमध्ये अनेक मतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी आणली नसल्यामुळेही हा गोंधळ झाला.

१०. मुंब्रा येथे मुसलमानबहुल भागात मतदान केंद्रावर पुष्कळ गर्दी झाली होती. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया मंदावली.

अनेक ठिकाणी मतदानास दिरंगाई झाल्याने निवडणूक आयोगाकडे वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती.


मतदान केंद्रावर मतदानासाठी जाणूनबुजून विलंब ! – उद्धव ठाकरे

मुंबई – ठाकरे गटाला ज्या ठिकाणी जास्त मते पडतात, तेथील केंद्रांवर जाणूनबुजून विलंब केला जात आहे. मतदारांना मुद्दामहून ताटकळत ठेवले जात आहे. कितीही वेळ लागला, तरी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. ‘मतदारांनी मतदानाला उतरू नये, त्यांनी बाहेरच्या रांगा पाहून कंटाळून परत जावे, यासाठी सरकारचा डाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मतदानाला जाणून बूजून वेळ केला जात असेल, तर तुम्ही जवळच्या शिवसेना शाखेला याची माहिती द्या’, असेही ते या वेळी म्हणाले. ‘शेवटचा मतदार मतदान करत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग मतदान थांबवू शकत नाही, त्यामुळे वेळेच्या आधी मतदारांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान करावे’, असे आवाहन त्यांनी केले.

संपादकीय भूमिका :

मतदान प्रक्रियेत आलेले अडथळे म्हणजे सर्वांत मोठी लोकशाही असणार्‍या भारतासाठी लाजिरवाणाच प्रकार होय !