१७ वर्षे ओळख लपवून वास्तव्य !
पुणे – नागपूरमधील समता सहकारी अधिकोषातील १४५ कोटी रुपयांच्या आर्थिक अपव्यवहार प्रकरणात १७ वर्षे फरारी असलेल्या विजयकुमार दायमा या आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पथकाने भाग्यनगरमधून (हैद्राबाद) अटक केली आहे. फरारी आरोपी गेली १७ वर्षे पुणे, मुंबई, तेलंगाणा परिसरात ओळख लपवून वास्तव्य करत असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.
नागपूर येथील समता सहकारी अधिकोषातील अधिकारी, कर्मचारी, अधिकोषांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांनी बनावट कर्जप्रकरणे सादर करून १४५ कोटी ६० लाख रुपयांचा अपव्यवहार केला होता. या प्रकरणी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस ठाण्यात वर्ष २००७ मध्ये अपहार, तसेच फसवणूक केल्याप्रकरणी ५७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता. आरोपी भाग्यनगरमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती सीआयडीच्या पुणे कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला येथून अटक केली. त्याला नागपूरमधील सीआयडीच्या कह्यात देण्यात आले आहे.