काँग्रेसीकरणामुळे भारताची ५ दशके वाया गेली ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – भारतासमवेत स्वातंत्र्य झालेले कितीतरी देश पुढे गेले. भारतीय कुठेही अल्प नव्हते; मात्र काँग्रेसने भारतियांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला नाही. स्वातंत्र्यानंतर गांधीजींच्या सल्लानुसार काँग्रेस विसर्जित केली असती, तर भारत ५ पट पुढे गेला असता. स्वातंत्र्यानंतर सर्व व्यवस्थेचे काँग्रेसीकरण केल्यामुळे भारताची ५ दशके वाया केली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. १७ मे या दिवशी दादर येथे शिवाजी पार्क मैदानावरील महायुतीच्या सार्वजनिक सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांसह लोकशाही विकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते.

सभास्थळी येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, डॉ. बाळासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस्थळ आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळांना भेट दिली. नरेंद्र मोदी यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी भाषणाला प्रारंभ केला. या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जगात ६ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ही देशाची होती. वर्ष २०१४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर गेली होती; मात्र मागील १० वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आली आहे. येत्या काही वर्षांत भारत जगात तिसर्‍या क्रमांकाची आर्थिक ताकद होईल. काँग्रेसला अयोध्येत राममंदिर असंभव वाटत होते. जगाला कधीतरी हे स्वीकारावे लागेल की, श्रीराममंदिरासाठी भारतियांनी ५०० वर्षे अविरत संघर्ष केला आहे. लाखो लोकांनी राममंदिरासाठी बलीदान दिले आहे. त्या ठिकाणी भव्य मंदिरात रामलल्ला विराजमान झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेले ३७० कलम जगातील कोणतीही ताकद पुन्हा आणू शकत नाही. मुंबई केवळ स्वप्न बघत नाही, तर स्वप्न साकार करते. आपल्या सर्वांना मिळून विकसित भारत निर्माण करायचा आहे. यामध्ये मुंबईची मोठी भूमिका आहे. मुंबई भारताची आर्थिक शक्तीकेंद्र आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक गुंतवणूक होत आहे. आम्ही मुंबईला तिचा हक्क देण्यासाठी आलो आहोत.’’

शालेय अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा समावेश करावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

भारतभूमी १ सहस्र वर्षे परकीय साम्राज्यात होती. त्यामध्ये १२५ वर्षे या हिंदभूमीवर मराठ्यांचे साम्राज्य होते. हा मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात बालपणापासून शिकवला जावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. शिवरायांची खरी स्मारके गड-दुर्ग आहे. त्यांना पुन्हा ऐतिहासिक रूप देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समितीची नियुक्ती करण्यात यावी. मागील १८-१९ वर्षे प्रलंबित असलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकर व्हावा. ओवैसींसारख्यांमागे फिरणार्‍यांच्या विचारांचे काही अड्डे अद्यापही देशात आहेत. तेथे माणसे घुसवून देश एकदा कायमस्वरूपी सुरक्षित करावा.