घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता !

मुंबई, १६ मे (वार्ता.) – घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाला प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या सर्वच प्रकरणाची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी होण्याची शक्यता आहे.

या दुर्घटनेनंतर लोहमार्ग पोलीस महासंचालक श्रीमती प्रज्ञा सरोदे यांनी लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सिसवे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. माजी लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालीद यांच्या काळात ‘इगो मिडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला होर्डिंग उभारण्यासाठी १० वर्षांसाठी रेल्वेची जागा भाड्याने देण्यात आली होती. यातून रेल्वे प्रशासनाला प्रतिमहिन्याला १७ लाख रुपये भाडे मिळत होते. होर्डिंग उभारतांना ४० चौरस फूट होर्डिंग उभारण्याला अनुमती असतांना याहून अवाढव्य होर्डिंग कसे काय उभारण्यात आले ? अशा प्रकारे अवाढव्य होर्डिंग उभारणार्‍यांवर कारवाई का करण्यात आली नाही ? होर्डिंगचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येत होते का ? याविषयीची चौकशी केली जाणार आहे. घाटकोपर येथे कोसळलेले होर्डिंग १२० चौरस फूट होते.

होर्डिंगसाठीचा खड्डा अल्प खोल खोदण्यात आल्याचे प्राथमिक अनुमान !

घाटकोपर येथे कोसळलेल्या होर्डिंगसाठीचा खड्डा अल्प खोल खोदण्यात आला होता. पाया भक्कम नसल्यामुळे होर्डिंग पडले, असे प्राथमिक चौकशीत आढळून आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस कार्यालयातून देण्यात आली.