Bangladeshi Terrorist Arrested : अल्-कायदाच्या २ बांगलादेशी आतंकवाद्यांना गौहत्ती (आसाम) येथून अटक !

आसाममध्ये आतंकवाद्यांचे जाळे पसरवण्यासाठी भारतात बेकायदेशीर वास्तव्य !

अल्-कायदाच्या २ बांगलादेशी आतंकवाद्यांना गौहत्ती (आसाम) येथून अटक

गौहत्ती (आसाम) – अल्-कायदाशी संबंधित २ आतंकवाद्यांना १३ मे या दिवशी येथील रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. बहार मियां (वय ३० वर्षे) आणि विरल मियां (वय ४० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही बांगलादेशाचे नागरिक असून ते कोणत्याही पारपत्राविना भारतात बेकायदेशीररित्या रहात होते. त्यांच्याकडे भारतीय दस्तऐवजही सापडले आहेत. त्यांचा वापर त्यांनी आसाममध्ये आतंकवाद्यांचे जाळे पसरवण्यासाठी केला होता.

१. यासंदर्भात एका अधिकार्‍याने माहिती दिली की, हे दोघे तरुणांना आतंकवादी संघटनेत सहभागी करून घेण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

२. याआधीही बांगलादेशाची आतंकवादी संघटना ‘अन्सारुल बांगला टीम’च्या अब्दुस सुकूर अली याला आसाममध्ये अटक करण्यात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये या संघटनेशी संबंधित ३ लोकांना धुबरी येथून अटक करण्यात आली होती.

३. गेल्या वर्षी आसाम पोलिसांनी ‘अन्सारुल बांगला टीम’ आणि ‘अल्-कायदा भारतीय उपखंड’ यांच्या ९ गटांना उघड केले होते. त्यांच्याशी संबंधित ५३ लोकांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर असे खासगी मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले, जेथे आतंकवादी संघटनांशी संबंधित शिक्षक तरुणांकडून कट्टरतावादाचे धडे गिरवून घेत होते.