असदुद्दीन ओवैसी यांची नवनीत राणा यांच्याविषयी गरळओक !
भाग्यनगरमधून (हैद्राबाद) नवनीत राणांनी ओवैसींना आव्हान केल्याचे प्रकरण !
मुंबई – १५ सेकंद काय, एक घंट्याचा वेळ घ्या आणि दाखवा तुम्ही काय करू शकता ? मी म्हणतो की, १५ सेकंद द्या त्यांना, काय कराल तुम्ही ? कोण घाबरले आहे ? आम्ही सिद्ध आहोत. कुणी यासाठी उघड आव्हान करत आहे, तर करावे, अशी गरळओक असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्याविषयी केली आहे. नवनीत राणा यांनी ओवैसींना आव्हान देतांना ‘फक्त ५ सेकंद पोलीस हटवा, मोठ्या आणि धाकट्याला कळणारही नाही की, कुठून आले अन् कुठे गायब झाले’, असे म्हटले होते. नवनीत राणा यांनी एम्.आय.एम्.चे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांना थेट आव्हान दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. एम्.आय.एम्.ने राणांच्या विधानावरून थेट भाजपला लक्ष्य केले आहे. यासह निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणीही केली आहे.
काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा ?
एक धाकटा आणि एक मोठा भाऊ आहे. त्यातील धाकटा भाऊ म्हणतो की, पोलिसांना १५ मिनिटांसाठी हटवले, तर आम्ही काय करू शकतो ? हे दाखवून देऊ. त्यांना माझे एवढेच सांगणे आहे की, तुम्ही १५ मिनिटे मागता; पण आम्हाला १५ सेकंद पुरेसे आहेत. १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवा, मग आम्ही काय ते सांगतो. ओवैसी बंधूंना कुठून आले आणि कुठे गायब झाले, हे कळणारही नाही, असे नवनीत राणा यांनी म्हटले होते. भाग्यनगरमध्ये (हैद्राबाद) त्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या प्रचाराच्या वेळी बोलत होत्या.