पळशी (जिल्हा जालना) येथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची !

छत्रपती संभाजीनगर – जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या पळशी गावात प्रचारासाठी गेलेले रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि विधान परिषदेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलकांनी अडवले. या वेळी आंदोलकांनी घोषणा दिल्याने दानवे यांना माघारी परतावे लागले. या विरोधामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्याचसमवेत पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यातही संघर्ष झाला. शेवटी पोलिसांना बळाचाही वापर करावा लागला. छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेले पळशी गाव जालना लोकसभा मतदारसंघात आहे. तेथे प्रचारासाठी महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे गेले होेते. गावात त्यांना मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मराठा आरक्षण, शेती आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी २५ वर्षांत काय केले ? असा थेट प्रश्न मतदारांनी विचारला होता. यावर संवाद साधून मतदारांचे समाधान करण्याऐवजी दानवे महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना  भेटण्यातच दंग होते. त्यामुळे आंदोलकांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मराठा तरुणांनी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन दानवे यांना विरोध केला.