रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात मुख्य लढत !

नारायण राणे व विनायक राऊत

रत्नागिरी – रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रत्येकी ३ विधानसभा क्षेत्र एकत्र करून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ वर्ष २००८ मध्ये सिद्ध करण्यात आला आहे. वर्ष २००९ मध्ये या मतदारसंघात पहिली लोकसभा निवडणूक पार पडली होती. याच पहिल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाला होता आणि त्या वेळी नीलेश राणे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर या जागेवर मात्र शिवसेनेनेच विजय पटकावला आहे. या वेळी या मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत, तर महायुतीकडून नारायण राणे या २ उमेदवारांत मुख्य लढत होणार आहे.

वर्ष २००९ मध्ये त्या वेळी काँग्रेसचे नीलेश राणे यांना ३,५३,९१५ मते मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सुरेश प्रभु यांचा ४६,७५० मतांनी पराभव केला. सुरेश प्रभु यांना ३,०७,१६५ मते मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला मिळाली. येथून शिवसेनेने विनायक राऊतांना उमेदवारी दिली होती. विनायक राऊतांनी काँग्रेसच्या पक्षातील नीलेश राणे यांचा १,५०,०५१ मतांनी पराभव केला. यानंतर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीतही विनायक राऊत यांनी पुन्हा विजय मिळवला. त्यांनी ही जागा १,७८,३२२ मतांनी जिंकली होती. या निवडणुकीत विनायक राऊत यांना ४,५८,०२२ मते मिळाली, तर नीलेश राणे यांना २,७९,७०० मते मिळाली होती.

आता ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्याविरोधात महायुतीतील भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर होणारी ही निवडणूक असल्याने नारायण राणे विजयी होणार कि विनायक राऊत सलग तिसर्‍या वेळी यश मिळवतात, हे ४ जून या दिवशी कळू शकेल.