महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची आणि न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया ! – पालकमंत्री उदय सामंत

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

रत्नागिरी, १ मे (जि.मा.का.) – आपल्याकडे जाती, धर्म, सण, उत्सव, संस्कृती आणि परंपरा यांच्यात वैविध्य असले, तरी त्यात सुंदर असे एकात्मतेचे सूत्र नेहमीच ठळकपणे अधोरेखित झाले आहे. आपल्यातील हाच गोडवा, प्रेम, आपुलकी, स्नेह पुढील काळातही जपूया. महाराष्ट्राची सामाजिक ऐक्याची नि सामाजिक न्यायाची उज्ज्वल परंपरा अखंड ठेवूया, अशा शब्दांत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने  शुभेच्छा दिल्या. येथील पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते पार पडला. या वेळी जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत शुभेच्छा संदेशात पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६५ वा दिन साजरा होत आहे. महाराष्ट्राला संतांची थोर परंपरा लाभली आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी अनेकांना हौतात्म्य पत्कारावे लागले. या शूर हुतात्म्यांना आजच्या दिनी अभिवादन करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. हे जग कष्टकरी कामगारांच्या श्रमावर चालते, हे सप्रमाण सिद्ध करणार्‍या माझ्या कामगार बांधवांनाही आजच्या कामगारदिनी मी मनापासून शुभेच्छा देतो.

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातही ध्वजारोहण !

रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.