Assam Congress leader arrested: आसाममधील काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक

गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याचे प्रकरण

रितम सिंह

गोहत्ती (आसाम) – भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याच्या प्रकरणी आसाम पोलिसांनी काँग्रेसचा नेता रितम सिंह याला अटक केली आहे.  रितम सिंह आसाममधील काँग्रेसच्या कार्यालयातील समन्वयक आहे. रितम याने अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर करतांना भाजप नेत्यांना कारागृहात पाठवण्याची धमकीही दिली होती.

रितम सिंह याने त्याच्या एक्स खात्यावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमित शहा अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचे आरक्षण संपवण्याची घोषणा करत असल्याचे दाखवण्यात आले होते.

दीपक कुमार दास यांनी याविरोधात येथील पान बाजार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ ए, १७१ ग, ५०५(१)(ब) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ फ अंतर्गत रितमविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. याची माहिती मिळताच त्याने व्हिडिओची पोस्ट हटवली होती.