खडकवासला कालव्यातून विनाअनुमती पाणी उपसा करणार्‍या ३ शेतकर्‍यांवर कारवाई !

खडकवासला धरण

पुणे – खडकवासला धरणातून ४ एप्रिलपासून उन्हाळी हंगामासाठी आवर्तन चालू आहे. आवर्तन चालू झाल्यानंतर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी बारामतीचे प्रातांधिकारी वैभव नवाडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्यासह कालवा परिसराची पहाणी केली. या वेळी खडकवासला उजव्या कालव्यातून विनाअनुमती पाणीउपसा करणार्‍या शिर्सुफळ येथील ३ शेतकर्‍यांना कह्यात घेतले आहे. आवर्तन चालू केल्यानंतर कालव्याच्या दोन्ही बाजूंनी विनाअनुमती पाणीउपसा केला जातो, त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी १४४ कलम लागू केले आहे. त्याप्रमाणे खडकवासला ते इंदापूरपर्यंत संपूर्ण कालवा परिसरामध्ये गस्त घातली जात आहे.

२३ एप्रिल या दिवशी वरवंड, भिगवण आणि शिर्सुफळ येथील ३ शेतकर्‍यांवर कारवाई करण्यात आली. वरवंड आणि भिगवण येथे दरवाजा उघडून विनाअनुमती पाणीउपसा चालू असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पुणे पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्या सुनंदा जगताप यांनी कालवा परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे केली होती.