लहान मुलांसाठी अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धांचे आयोजन केले जाते. नुकत्याच एका शाळेतील वेशभूषा स्पर्धेत ३ वर्षांच्या लहान मुलाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. त्याने वेशभूषा तरी कोणती केली होती ? तर त्याने त्याच्या टी-शर्टवर एक कागद चिकटवला होता. त्यावर इंग्रजीत लिहिले होते, ‘मी माझ्या बायकोशी भांडलो.’ त्याने कपाळावरील जखमेवर पट्टी लावण्याची वेशभूषा केली होती, तसेच डाव्या हाताला प्लास्टर बांधून हात गळ्यात अडकवला होता. डाव्या डोळ्यावर ठोसा लगावल्याप्रमाणे तो काळसर झाल्याचे दाखवले होते. थोडक्यात काय, तर बायकोसमवेत भांडल्यामुळे तिने अशा प्रकारे अवस्था केल्याचे या वेशभूषेतून दाखवण्यात आले होते. या मुलाचे छायाचित्र पाहून कुणालाही त्याची कीव येईल ! इतकी आजच्या मुलांची दयनीय स्थिती झाली आहे. नवरा-बायकोचे भांडण, त्यातून होणारा हिंसाचार, पत्नी-पत्नीचे असणारे नाते यांविषयी त्या बालमनाला काय ठाऊक असणार ? त्या विषयाशीच पूर्णपणे अनभिज्ञ असतांना, तसेच न कळते वय असतांना अशी हिंसक स्वरूपाची वेशभूषा मुलाला साकारण्यास देणार्या पालकांविषयी अनेक नेटकर्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अशा वेशभूषांच्या माध्यमातून पालक मुलांना काय शिकवत आहेत ? कोणते धडे देत आहेत ? याची त्यांना तरी कल्पना आहे का ? केवळ क्रमांक मिळवण्याच्या हव्यासापोटी अशी वेशभूषा करायला लावल्याने समाजमनावर अयोग्य संस्कार निर्माण होतात. हे पालकांच्या लक्षात येत नाही का ? ‘बायकोशी भांडल्यावर अशी गत होते’, असा चुकीचा संदेश या वेशभूषेतून लोकांपर्यंत पोचला. काही जण हे हसण्यावारी सोडूनही देतील; पण ती सोडून देण्याची गोष्ट नाही. मुलांना शोभेल अशी आणि त्यांच्यासाठी आदर्शवत् ठरणारी एखादी व्यक्तीरेखा साकारायला देणेच उचित ठरू शकते. अशा व्यक्तीमत्त्वांचा पालकांनी शोध घेऊन तशी वेशभूषा मुलांना साकारायला द्यायला हवी ! वरील स्वरूपाच्या अशा प्रसंगांमुळे ‘आपणच आपल्या मुलांना कुठे घेऊन चाललो आहोत ?’, असा प्रश्न पडतो.
हे झाले पालकांचे; पण शाळेचेही यात काही दायित्व आहे कि नाही ? अशी वेशभूषा केलेल्या मुलाला प्रथम क्रमांक देणे, म्हणजे नकारात्मक आणि हिंसक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. हे शाळेच्या लक्षात कसे आले नाही ? आज एका मुलाने अशी वेशभूषा केली आणि त्याला प्रथम क्रमांक मिळाला, हे पाहून उद्या अन्य मुलांनी गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी किंवा आतंकवादी अशा स्वरूपाची वेशभूषा साकारल्यास आपण काय करणार आहोत ? आजची मुले म्हणजे देशाची भावी पिढी आहे. तिच्यावर अयोग्य किंवा विकृत गोष्टी, हिंसक वृत्ती यांचे कुसंस्कार होऊ नयेत, याची काळजी शाळा आणि पालक यांनी घ्यावी !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.