कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सापडले ५० हून अधिक भ्रमणभाष !

कारागृहाच्या तटबंदीची उंची २४ फूट होणार !

कोल्हापूर – येथील कळंबा मध्यवर्ती कारागृह सातत्याने भ्रमणभाष, गांजा, टोळीयुद्धासह अन्य कारणांनी चर्चेत हे; मात्र आता कारागृहाची तटबंदी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे. ‘क्लीन स्वीप मोहिमे’त कारागृहाची झडती घेतांना ५० हून अधिक भ्रमणभाष सापडल्याने प्रशासनही चक्रावले आहे. हे रोखण्यासाठी तटबंदीची उंची २४ फूट होणार आहे. त्यासह अवैधरीत्या भ्रमणभाष वापरण्याची सवय संपवण्यासाठी बंदिवानांना ‘ॲलन स्मार्ट फोन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संबंधित बंदिवानांवर जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू आहे. (हे पोलिसांना ठाऊक नसेल, यावर कोण विश्वास ठेवेल ? – संपादक)

कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदाचा कार्यभार शामकांत चंद्रकांत शेडगे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने ‘क्लीन स्वीप मोहिमे’चा आरंभ केला. तंबाखूच्या १३ पुड्यांमध्ये २१४ ग्रॅम गांजा सापडल्यानंतर आता कारागृहातील बंदीवानांकडे ५० भ्रमणभाषसंच सापडले आहेत. तंबाखूच्या पुड्यांमधून कारागृहात पोचलेला गांजा कुणी आणि कुणासाठी पाठवला होता ? इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रमणभाषसंच कारागृहात आले कसे ? याचा शोध घेण्याचे आव्हान कारागृह पोलिसांसह जुना राजवाडा पोलिसांसमोर आहे.