Imran Khan Bail : पाकिस्तानी सैन्याशी झालेल्या करारामुळे इम्रान खान यांना मिळणार जामीन !

सैन्यप्रमुखांच्या विरोधात कोणतेही वक्तव्य न करण्याची अट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – गेल्या ८ महिन्यांपासून कारागृहात असलेले पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या पत्नीसह लवकरच जामीन मिळण्याची शक्यता आहे. इम्रान खान यांचा पक्ष ‘पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ’ आणि पाकिस्तानी सैन्य यांच्यात एक करार झाला असून इम्रान खान यांना नजरकैदेत ठेवले जाईल.

या कराराच्या अंतर्गत सैन्यप्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात खान यांना कोणतेही वक्तव्य करता कामा नये, अन्यथा त्यांना पुन्हा कारागृहात टाकले जाईल. अन्य अधिकार्‍यांच्या विरोधात मात्र बोलण्याची त्यांना मुभा असेल. पाकमधील राजकीय विश्‍लेषक मजहर यांच्यानुसार, पाकिस्तानच्या राजकारणात ज्या वेगाने राजकारण्यांवर गुन्हे प्रविष्ट (दाखल) होतात, तद्वतच ते बंदही होतात.

कोणत्या प्रकरणात इम्रान खान भोगत आहेत कारावासाची शिक्षा ?

इम्रान खान हे तोशखाना, म्हणजे पंतप्रधानपदी असतांना राष्ट्रप्रमुख म्हणून अन्य देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तो सिद्ध झाला आहे. या प्रकरणी ते १४ वर्षांच्या कारागृहवासाची शिक्षा भोगत आहेत. याखेरीज गुप्त कागदपत्रांच्या चोरीच्या प्रकरणीही त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आता या दोन्ही प्रकरणांत त्यांना जामीन मिळणार आहे. भूमी हडपल्याप्रकरणी अल् कादिरचा खटलाही त्यांच्या विरोधात चालू रहाणार आहे.