जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एक दिवसांचे चर्चासत्र उत्साहात
रत्नागिरी – कित्येक वर्षांपूर्वी शैव आणि वैष्णव यांमध्ये असलेले वाद अन् भेद आदि शंकराचार्य यांना भारताच्या परिक्रमेतून आणखी जवळून अनुभवता आले. हा वाद मिटावा, यासाठी त्यांनी पंचायतन पूजा चालू केली. आजही आधुनिक काळात अनेकांच्या देवघरात ही पंचायतन पूजा पहायला मिळते. सर्व संप्रदाय एकत्र यावेत, यासाठी कुंभमेळा चालू करून दशनामी आखाडे यांचीही निर्मिती त्यांनी केली. या दशनामी आखाड्यातील प्रत्येकाचे कार्यही ठरवून दिले. परदेशी अधर्मी लोकांचे आक्रमण नियंत्रित ठेवण्यापासून ते अगदी सागर आणि महासागर यांच्या रक्षणाचे दायित्व, पर्वत, शिखरे यांचे रक्षण अन् त्यांच्या नैसर्गिक वैविध्याची सुरक्षितता असे दायित्व त्या त्या आखाड्यानुसार दिले होते. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे जसा यज्ञ करणारा पवित्र होतो, तसा यज्ञही शुचिर्भूत व्हावा यासाठी यज्ञातील पशूहिंसा सर्वांत आदि शंकराचार्यांनी बंद केली, असे प्रतिपादन व्याख्याते श्रीनिवास पेंडसे यांनी केले. ते जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एक दिवसांचे चर्चासत्रात बोलत होते.
या चर्चासत्राचे आयोजन कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतील भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात करण्यात आले होते. कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां.वां. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने आयोजित आणि नवी देहलीतील भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
श्रीनिवास पेंडसे पुढे म्हणाले की, जगद्गुरु आदि शंकराचार्य यांनी एकात्म भारताचा विचार स्वतःच्या कार्यातून नेहमीच केला आणि त्याच अनुषंगाने त्यांचे कार्य चालू ठेवले भारताची परिक्रमा करत असतांना जगद्गुरु आदि शंकराचार्यांनी समाजातील आणि संप्रदायातील भेदभावांचे उच्चाटन केले अन् समाज आणि संप्रदाय एकसंध कसा राहील ?याचाच प्रयत्न केला.
दुपारच्या सत्रात ‘शंकराचार्यांचे तत्त्वज्ञान आणि स्तोत्र वाङ्मय’ हा विषय स्पष्ट करताना प्रा. अंजली बर्वे म्हणाल्या की, आदि शंकराचार्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी काठीण्य पातळी तपासणार्या अशा ब्रह्मसूत्रांवर भाष्य केले आणि दुसर्याच बाजूला सामान्य लोकांसाठी सुटसुटीत अशा स्तोत्रांची रचनाही केली. यावरून आदि शंकराचार्य दोन्ही टोकांवर समाजाचे प्रबोधन करत होते, हे स्पष्ट होते. स्वतःच्या कार्यातून शंकराचार्यांनी द्वैतवाद भेद मोडून काढला. भारताच्या परिक्रमेतून शंकराचार्यांनी ज्या ठिकाणांना, तीर्थक्षेत्रांना भेट दिली त्यावर स्तोत्रे रचली. या स्तोत्रांमधील वर्णन आणि तत्कालीन नैसर्गिक वैविध्य भारावून टाकणारे आहे.
या कार्यक्रमात नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराज यांच्या वेदपाठशाळेतील विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चारण केले. यामुळे चर्चासत्राला एक आध्यात्मिक आणि मांगल्याचा स्पर्श झाला होता. या चर्चासत्राला कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पाण्डेय, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपकेंद्र संचालक डॉ. दिनकर मराठे प्रमुख उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमात प्रमुख अतिथी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये म्हणाल्या की, आदि शंकराचार्य यांचे व्यक्तीमत्त्व एका समाजसुधारकासारखे आहे.