Ukraine FM India Visit : (म्हणे) ‘सोव्हिएत युनियन संपुष्टात आले असल्याने भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांना भविष्य नाही !’ – युक्रेन

युक्रेनचा दावा !

युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा

नवी देहली – भारत आणि रशिया यांच्यातील संबंध हा सोव्हिएत काळातील वारसा आहे. सोव्हिएत युनियन संपुष्टात आले आहे आणि त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना भविष्य नाही, असे विधान भारताच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर आलेले युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे. एन्.डी.टी.व्ही. वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

१. दिमित्रो कुलेबा पुढे म्हणाले की, माझा विश्‍वास आहे की, भारत-युक्रेन संबंधांचे भविष्य चांगले असू शकते; परंतु जर भारत आणि रशिया इतके जवळ असतील, तर भारत रशियाच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर करू शकतो. जागतिक स्तरावर भारताचा आवाज अतिशय महत्त्वाचा आहे आणि युक्रेनमध्ये शांततेसाठी आम्हाला त्याची आवश्यकता आहे.

२. रशिया-युक्रेन युद्धावर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या विधानाचा पुनरुच्चार करतांना कुलेबा म्हणाले की, हे युद्धाचे युग नाही. ‘ग्लोबल साऊथ’च्या (दक्षिण गोलार्धातील) देशांना शांततेसाठी एकत्र आणण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत कोणत्याही बैठकीत सहभागी झाला, तर इतर देशांनाही या बैठकीत सहभागी होणे अधिक सोयीचे वाटेल. यामुळे युक्रेन आणि भारताचे संबंध सुधारतील आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदरही वाढेल. बळजोरीने कुणीही सीमा पालटू शकत नाही, हा संदेश जगाला जाईल. कोणताही देश आपल्या शेजार्‍यांवर आक्रमण करून अत्याचार करू शकत नाही.

३. युद्धाच्या काळात भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याच्या सूत्रावर कुलेबा म्हणाले की, तेल व्यवहार भारतीय चलनात होतात. हे रशियाला साहाय्य करत नाही आणि म्हणून आम्हाला त्याविषयी कोणतीही अडचण नाही.

संपादकीय भूमिका

काश्मीरच्या प्रश्‍नी पाकिस्तानची बाजू घेणार्‍या युक्रेनने ‘भारताचे त्याचे मित्रदेशाशी कसे संबंध असणार ?’, यावर ज्ञान पाजळू नये, असे भारताने सांगितले पाहिजे !