शवविच्छेदन अहवाल अयोग्य दिल्याने उच्च न्यायालयाकडून आधुनिक वैद्यांवर कारवाईचे आदेश


मुंबई
– १० जुलै २०२० या दिवशी हत्या झालेल्या एका प्रकरणात शवविच्छेदन करतांना निष्काळजीपणा आणि अनियमितता यांमुळे मुरबाड येथील आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आरोग्य सचिव आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना  दिले.

शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते. संबंधित घटनेतील आरोपींनी त्यामुळे जामिनासाठी अर्ज केला होता. वर्ष २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने मृत्यूच्या कारणाची अचूक माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापनेचे आदेश दिले. साहायक सरकारी अधिवक्त्यांनी शोध घेतल्यावर काही गोष्टी समोर आल्या.

आधुनिक वैद्य एन्.ए. फड यांनी मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांच्या खासगी रुग्णालयाच्या पत्रावर हा अहवाल दिला होता. या तपासात शवविच्छेदन अहवालातील दस्तऐवजीकरण आणि निष्कर्ष यांमध्ये तफावत होती. दुखापतीच्या वर्णनात विरोधाभास होता. महत्त्वाची माहिती योग्यरित्या नोंदवण्यात आली नव्हती, तसेच अहवालात शवविच्छेदनाची तारीख चुकीची होती.

संपादकीय भूमिका 

वैद्यकीय क्षेत्रातील असा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवाचे बरेवाईट करण्यास कारणीभूत ठरू शकतो.