सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना रामनाथी (गोवा) आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

२८ मार्च २०२४ या दिवशी ‘श्रीमती मनीषा केळकर यांच्यावर बालपणी झालेले धार्मिक संस्कार, शिक्षण’ इत्यादी पाहिले. आता या भागात ‘त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर त्यांनी केलेली साधना, केलेल्या सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ पहाणार आहोत.

(भाग २)

भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/778395.html

श्रीमती मनीषा विजय केळकर

६. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला झालेला आरंभ !

६ अ. सनातन संस्था घेत असलेल्या साप्ताहिक सत्संगाला जाणे : ‘वर्ष २००० मध्ये देवरुख येथे सनातन संस्थेकडून साप्ताहिक सत्संग घेतला जाऊ लागला. मलाही त्यासाठी बोलावले होते. ‘सत्संगाच्या ठरवलेल्या वेळी देवता तिथे उपस्थित असतात’, असे मला सांगितल्यामुळे मी सत्संगाला वेळेवर आणि आवडीने जात असे. मला सत्संगाची पुष्कळ ओढ लागली होती. त्यामुळे मी त्या दिवशी घरातील कामे भराभर आवरून ठेवत असे. ‘आज सत्संगात काय सांगणार ?’, अशी मला उत्सुकता लागत असे. सत्संगात शिकवलेले मी लिहून घेत असे. मला अर्पणाचे महत्त्व कळल्यावर मी अर्पण देण्यासही आरंभ केला.

६ आ. नामस्मरणाचे महत्त्व कळल्यावर स्तोत्र न शिकता नामस्मरण करणे : मी ‘शिवमहिम्नस्तोत्र’ शिकले होते. नंतर मी ‘विष्णुसहस्रनाम’ शिकणार होते; पण त्याच सुमारास मला सनातनच्या सत्संगातून नामाचे महत्त्व कळले. त्यामुळे ‘विष्णुसहस्रनाम’ न शिकता मी नामस्मरणाकडे लक्ष देऊ लागले.

६ इ. कुलदेवीचे नामस्मरण करतांना आलेल्या अनुभूती !

६ इ १. जवळपास सुगंध येण्यासारखे काही नसतांना कुलदेवीचा नामजप करतांना मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध येणे : पूर्वी मी ‘साईबाबांचे नामस्मरण, पोथीवाचन आणि स्तोत्र म्हणणे’, अशी साधना करत होते. मला सनातनच्या सत्संगात ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांच्या नामस्मरणाचे महत्त्व कळले. मी सत्संग घेणार्‍या सौ. फाटक यांना विचारले, ‘‘मी साईबाबांचे नामस्मरण आणि पोथीवाचन करते. त्यामुळे मी ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप कसे करू शकते ?’’ त्या म्हणाल्या, ‘देव माणूस आहे का रागवायला ? आपण योग्य मार्गाने चाललो, तर ते देवालाही आवडते. साधना योग्य मार्गाने होत असेल, तर अनुभूतीही येतात.’’ त्यानंतर मी साईबाबांचे छायाचित्र समोर ठेवून ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करू लागले. तेव्हा एकदा मला जवळपास मोगर्‍याची फुले नसतांनाही ३ वेळा मोगर्‍याच्या फुलांचा सुगंध आला.

६ इ २. ‘कुणीतरी प्रयत्नपूर्वक ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करून घेत आहे’, असे जाणवणे : ‘कुलदेवी’ किंवा ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करतांना जवळजवळ ६ मास माझ्या मुखात साईबाबांचा नामजप येत असे. तेव्हा ‘कुणीतरी प्रयत्नपूर्वक माझ्याकडून ‘कुलदेवी’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करून घेत आहे’, याची मला जाणीव होत असे.

या अनुभूतींमुळे ‘माझी साधना योग्य मार्गाने चालली आहे’, याविषयी माझी निश्चिती झाली.

७. गुरुकृपेने पैसे घेऊन मुलांना उत्तीर्ण करण्याच्या प्रलोभनाला बळी न पडणे

मी शाळेत नोकरी करत असतांना माझ्याकडे दहावीच्या बोर्डाच्या (एस्.एस्.सी. बोर्डाच्या) उत्तरपत्रिका तपासायला येत होत्या. तेव्हा अन्य शाळेतील एक शिक्षक अकस्मात् माझ्या घरी आले. त्यांनी मला विचारले, ‘‘आमच्या शाळेच्या दहावीच्या उत्तरपत्रिका तुमच्याकडे तपासायला आल्या आहेत ना ?’’; तेव्हा क्षणभर मला भीती वाटली. गुरुकृपेनेच मला सुचले आणि मी त्यांना सांगितले, ‘‘आल्या होत्या; मात्र घरी विवाह असल्यामुळे मी त्या लवकर तपासून पाठवून दिल्या.’’ त्यामुळे ते शिक्षक परत गेले आणि देवाने मला मोठ्या संकटातून सोडवले. ते शिक्षक मला सांगत होते, ‘‘हवे तेवढे पैसे घ्या आणि आमच्या शाळेच्या मुलांना पास करा.’’ त्यांनी समवेत पैसेही आणले होते; मात्र गुरुकृपेनेच मी प्रलोभनाला बळी पडण्यापासून वाचले.

मी साधना करत असल्यामुळे देवाने मला मोठ्या संकटातून अलगद बाहेर काढले. प्रथम संकट आल्यावर मला भीती वाटली; पण नंतर ‘त्यातून बाहेर कशी पडले ?’, हे मला कळलेही नाही.

८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ झालेली श्रद्धा !

८ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाहिले नसतांनाही त्यांना प्रार्थना केल्यावर त्यांचे सूक्ष्मातून दर्शन होणे : मी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केल्यावरही ‘नेमकी कुठल्या मार्गाने साधना करावी ?’, हे मला कळत नव्हते. माझ्या मनाची द्विधा अवस्था होती, तसेच आरंभी माझे लक्ष पैसे मिळवण्याकडे, ‘विविध परीक्षा देऊन वेतन कसे वाढेल ?’, यांकडे अधिक असायचे. मी मायेतच अधिक रमायचे. साधक मला गुरुदेवांचा महिमा पुष्कळ वर्णन करून सांगायचे; पण मी गुरुदेवांना अजून एकदाही पाहिले नव्हते. एकदा मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘मी आपले चरण सोडून कुठेच जाणार नाही’, अशी अनुभूती मला द्या. नंतर ‘मी अशी प्रार्थना केली आहे’, हे विसरून गेले. देवरुखच्या सेवाकेंद्रात सामूहिक नामजप करतांना तो भावपूर्ण होण्यासाठी मधेमधे थोडा वेळ थांबत असत. तेव्हा अकस्मात् माझे मन निर्विचार झाले आणि डोळे मिटल्यावर मला जांभळ्या रंगाचा कद नेसलेल्या गुरुदेवांचे दर्शन झाले. त्यांना पाहून ‘ही एक महान विभूती आहे’, अशी माझी निश्चिती झाली; कारण एक सामान्य व्यक्ती अशी अनुभूती देऊच शकत नाही. या अनुभूतीनंतर मी ‘त्यांचे चरण कधीच सोडायचे नाही’, असे मनोमन ठरवले.

८ आ. इतरांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना न करण्यास सांगूनही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचा निश्चय दृढ रहाणे

८ आ १. पूर्वी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्‍या एका साधिकेने साधना सोडण्यास सांगणे : पूर्वी सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणारी एक साधिका एकदा माझ्याकडे आली आणि मला सनातन संस्थेने सांगितलेली साधना न करण्याविषयी सांगू लागली. तेव्हा मी तिला ‘सनातन संस्थेची महानता, परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या कृपेने मला आलेल्या अनुभूती आणि नोकरी करतांना मला झालेले लाभ’, इत्यादींविषयी ठामपणे सांगितले. तेव्हा ती नाराज होऊन निघून गेली.

८ आ २. शंकरभक्तांनी केवळ शंकरभक्ती करण्याविषयी सांगणे : एकदा एक शंकरभक्त माझ्याकडे आले आणि मला केवळ शंकराचीच भक्ती करण्याविषयी सांगू लागले. तेव्हा मी त्यांना मला आलेल्या अनुभूती सांगितल्या. तेव्हा त्यांना सनातनच्या साधनामार्गाचे महत्त्व पटले.

केवळ सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेमुळेच माझा निश्चय दृढ राहू शकला. ‘श्री गुरूंनी शिष्याचा हात एकदा धरल्यावर ते शिष्याचा हात कधीच सोडत नाहीत’, हेच खरे !

९. साधना करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

९ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच न थकता दिवसभर कार्यरत राहू शकणे : मी देवरुख येथे रहात असतांना पहाटे ४ वाजता उठून घरातील सर्व कामे आवरून ६ वाजता सामूहिक नामजपाला जात असे. नंतर मी प्रवास करून नोकरीसाठी शाळेत जात असे. शाळा सुटल्यानंतर मी सत्संग आणि अध्यात्मप्रचार करून रात्री उशिरा घरी येत असे. ‘मी न थकता हे सर्व कसे करू शकते ?’, याचे माझ्या शेजार्‍यांना पुष्कळ आश्चर्य वाटत असे. केवळ गुरुमाऊलीच्या कृपेमुळेच मी हे सर्व करू शकत होते.

९ आ. शाळेतील गुरुपौर्णिमा करून सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेला जाता येणे, जातांना मार्गावर दुचाकी घसरूनही काही इजा न होणे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त नेसलेली साडीही खराब न होणे : शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करायची असल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला शाळेतून सुटी मिळत नव्हती. मी सनातन संस्थेने गुरुपौर्णिमेनिमित्त बसवलेल्या नाटिकेतही भाग घेतला होता. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रार्थना करून शाळेच्या अध्यक्षांना विचारले, ‘‘शाळेत गुरुपौर्णिमा सकाळी साजरी करू या का ? मी सर्व नियोजन करते. हा कार्यक्रम झाल्यावर मी जाऊ शकते का ?’’ तेव्हा त्यांनी मला तशी अनुमती दिली.

त्या दिवशी मार्गावर चिखल झाला होता. दुचाकीवरून सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमेसाठी जातांना चिखलावरून माझी दुचाकी घसरली; पण गुरुकृपेने मला काहीच लागले नाही आणि साडीही खराब झाली नाही. मला नाटिकेत तीच साडी वापरायची होती.

९ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने विद्यार्थ्यांच्या निकालात झालेली चूक वेळीच लक्षात येणे : एकदा मी इयत्ता ९ वीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल सिद्ध करत होते. माझ्या कानात कुणीतरी ‘निकालात चूक आहे’, असे सांगत होते; पण ‘मी व्यवस्थित आणि लक्षपूर्वक निकाल सिद्ध केला आहे. त्यांत चूक असूच शकत नाही’, असे ‘अहं’चे विचार माझ्या मनात होते. निकाल पुन्हा पडताळतांना त्यात एका ठिकाणी बेरजेची चूक लक्षात आली. त्यामुळे गुरुकृपेने ती वेळीच सुधारता आली.

९ ई. लहानपणी वाचलेल्या भविष्यानुसार ‘जगाचा कायापालट करणारी व्यक्ती म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आहेत’, याची निश्चिती होणे : लहानपणी मी सुप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता ‘नॉस्ट्रेडॅमस’ यांनी लिहिलेले भविष्य वाचले होते. त्यामध्ये ‘जगाचा कायापालट करण्यासाठी एक व्यक्ती भूतलावर अवतरेल’, असे लिहिले होते. तेव्हापासून ‘अशी थोर विभूती मला पहायला मिळावी’, असे मला वाटायचे. देवाने माझी सनातन संस्थेशी ओळख करून देऊन त्या माध्यमातून मला साधनेत आणले. हळूहळू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची दिव्यता माझ्या लक्षात येऊ लागली. महर्षींनीही जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून त्यांचे असामान्यत्व उलगडले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे ‘धर्मगुरु’, ‘राष्ट्रगुरु’, ‘मोक्षगुरु’ आणि ‘जगद्गुरु’ असून लहानपणी वाचलेल्या भविष्यानुसार ‘जगाचा कायापालट करणारी व्यक्ती, म्हणजे माझे श्री गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच आहेत’, याविषयी माझी निश्चिती झाली आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

मी वयाच्या ५५ व्या वर्षी साधनेत आले; पण मी लहान असल्यापासूनच माझ्या मनातील विचार श्री गुरूंना कळत होते. गुरुतत्त्व तेव्हापासूनच माझ्या समवेत होते. ‘देवाने माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण केल्या’, या जाणिवेने मला कृतज्ञता वाटते.

१०. कृतज्ञता

हे गुरुदेवा, आपणच आदिदेव, सनातन पुरुष आणि या जगाचे परम आश्रयस्थान आहात. आपणच जग जाणणारे आणि जाणण्याजोगेही आहात. परमधामही आपणच आहात आणि आपणच सर्व विश्व व्यापले आहे. आपणच माझा साधनाप्रवास माझ्याकडून लिहून घेतला. त्यासाठी मी आपल्या चरणी अत्यंत कृतज्ञ आहे.’

– श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( ४.१२.२०२३) (समाप्त)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक