लहानपणापासून धार्मिक वृत्ती असलेल्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी अतूट श्रद्धा असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे) !

१. घरातील धार्मिक वातावरण !

श्रीमती मनीषा विजय केळकर

१ अ. वडील सकाळी मोठ्याने स्तोत्रे म्हणत असल्यामुळे स्तोत्रे पाठ होणे आणि आईनेही देवाचे श्लोक म्हणून घेणे : ‘माझ्या लहानपणी माझे वडील पहाटे उठून देवासमोर बसून मोठ्याने गणपति, मारुति आणि रामरक्षा ही स्तोत्रे म्हणत असत. माझी ती स्तोत्रे ऐकूनच पाठ झाली होती. सायंकाळी आई देवघरात दिवा लावून शुभंकरोती म्हणायला शिकवत असे. आई-वडील कुलधर्माचे पालन करत असल्यामुळे घरातील वातावरण सात्त्विक होते. त्यामुळे माझ्यावर नकळतपणे देवाधर्माचे संस्कार झाले. शाळेत जातांना आई मला सूर्यदेवता आणि पिंपळ यांना नमस्कार करायला सांगत असे. आई माझ्याकडून सूर्याचा

‘आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।

अर्थ : जे लोक सूर्याला प्रतिदिन नमस्कार करतात, त्यांना सहस्रो जन्मांत दारिद्र्य प्राप्त होत नाही.

आणि

मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे ।
अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः ।।

अर्थ : मुळाशी ब्रह्माचे रूप धारण करणार्‍या, मध्यभागी विष्णुरूप आणि टोकाला शिवरूप धारण करणार्‍या हे वृक्षराज (अश्वत्थ वृक्षा), तुला आमचा नमस्कार असो.

हा पिंपळाचा श्लोक म्हणून घेत असे. माझी इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतची मराठी शाळा शंकराच्या देवळात भरत असे. त्यामुळे शाळेत गेल्यावर मी शंकराला नमस्कार करत असे.

 २. सणांना त्या त्या देवतेसाठी विविध फुलांचे हार बनवणे

पूर्वी मी श्री गणेशचतुर्थीला गणपतीला आणि चैत्रात गौरीला विविध फुलांचे हार करून घालत असे. श्री गणेशचतुर्थीला मी गणपतीला प्राजक्ताच्या २१ फुलांचा किंवा देठ खुडून १२१ फुलांचा हार करून घालत असे. ‘हार कसा केल्यावर छान दिसेल’, याकडे मी लक्ष देत असे. चैत्रात मी देवीला विविध फुलांचे हार करून घालत असे.

आधी मी हार केले असल्यामुळे आणि हार करण्यातील बारकावे मला ठाऊक झाल्यामुळे आता मला सनातनच्या आश्रमातील साधकांच्या विवाहप्रसंगी हार बनवण्याची सेवा मिळते.

३. प्रथमपासून असलेली देवाची ओढ !

३ अ. ‘शिवमहिम्नस्तोत्र’ ११ वेळा म्हणणे : मी महाविद्यालयात असतांना शंकराच्या देवळात जाऊन ‘शिवमहिम्नस्तोत्र’ म्हणायचे. तेव्हा तेथील पुरोहित मला म्हणाले, ‘‘शिवमहिम्नस्तोत्र’ म्हणतांना फलश्रुती सोडून बाकी सर्व श्लोक ११ वेळा म्हटले, तर एक एकादष्णी होते’’; म्हणून मी ते श्लोक ११ वेळा म्हणायचे.

३ आ. रात्री १२ वाजता अंघोळ करून ‘व्यंकटेशस्तोत्र’ म्हणणे : रात्री १२ वाजता (टीप १) अंघोळ करून ‘व्यंकटेशस्तोत्र’ म्हणण्याचे विधान (टीप २) असल्यामुळे महाविद्यालयात असतांना मी रात्री १२ वाजता उठून अंघोळ करून ‘व्यंकटेशस्तोत्र’ म्हणायचे. तेव्हा मला २१ व्या दिवशी शांतीची अनुभूती आली.

(टीप १ –  एकाग्रचित्ते एकांतीं । अनुष्ठान कीजे मध्यरातीं ।
बैसोनिया स्वस्थचित्तीं । प्रत्यक्ष मूर्ति प्रकटेल ।।

– व्यंकटेशस्तोत्र, श्लोक १०७)

अर्थ : ‘मध्यरात्री एकांतात शांतपणे बसून आणि संपूर्ण एकाग्रतेने हे स्तोत्र वाचले असता भगवान श्रीविष्णु स्वतः प्रकट होतील.

असे त्या स्तोत्राच्या फलश्रुतीत म्हटले आहे. त्या स्तोत्रासाठी या स्तोत्रकारानेच वरील ‘विधान’ ठरवले आहे. त्यामुळे ते स्तोत्र रात्री १२ वाजता अंघोळ करून म्हटले जाते. – पुरोहित अमर जोशी, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

(टीप २ – ‘एखादा मंत्र किंवा स्तोत्र कसे उपयोगात आणावे ?’, याविषयी त्या लेखकाने किंवा शास्त्रकारांनी जे काही लिहून ठेवले असेल, त्याला ‘विधान’ असे म्हटले जाते.’ – पुरोहित अमर जोशी, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.)

नवरात्रीच्या काळात सनातन संस्थेच्या आश्रमात झालेल्या यज्ञांच्या वेळी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी सांगितले, ‘शांती अनुभवणे, म्हणजे परब्रह्मस्वरूपाचे अस्तित्व अनुभवणे होय.’ हे मला मी सनातन संस्थेच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू लागल्यामुळे कळले. ‘मला ‘व्यंकटेशस्तोत्र’ म्हटल्यावर शांतीची अनुभूती आली होती’, त्याचे स्मरण झाले. यातून ‘ईश्वर योग्य वेळी एखाद्या साधकाच्या माध्यमातून उत्तरे देऊन शिकवतो’, हे मला शिकता आले.

४. महाविद्यालयात असतांना ‘एका संतांनी सांगितलेले भविष्य खोटे आहे’, असे वाटून ‘ते भोंदू असतील’, या विचाराने त्यांचा राग येणे; पण पुढे त्यांनी सांगितलेले भविष्य खरे ठरणे

मी रत्नागिरी येथील र.प. गोगटे महाविद्यालयात ‘बी.ए.’ च्या शेवटच्या वर्षाला होते. एकदा तिथे एक संत आले होते आणि ते व्यक्तीचे छायाचित्र पाहून तिचे भविष्य सांगत होते. मी त्यांना विचारले, ‘‘या वर्षी मी ‘बी.ए.’ ला आहे. मी पास होईन का ?, मला चांगले गुण मिळतील का ? आणि मला नोकरी केव्हा मिळेल ?’’ ते संत मला म्हणाले, ‘‘तू पास होशील. तुला चांगले गुण मिळतील आणि ‘बी.ए.’चा निकाल लागण्यापूर्वीच तुला नोकरी मिळेल.’’ तेव्हा मी मनात म्हटले, ‘अजून माझा अभ्यास झाला नाही, तर मला चांगले गुण कसे मिळणार ?, इतके लोक बेकार असतांना मला लगेच नोकरी कशी मिळणार ? हे चुकीचे सांगतात. यांना काहीच समजत नसावे.’ तिथे उपस्थित एकाने त्यांना माझ्या विवाहाविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले, ‘‘नोकरी मिळाल्यानंतर हिचा विवाह होईल. सर्व काही चांगले होईल.’’ तेव्हा ‘हे भोंदू संत असतील’, असे वाटून मला त्यांचा राग आला आणि मी माझे छायाचित्रही त्यांच्या हातातून काढून घेतले; पण ते संत शांत होते. ते प्रेमाने ‘अजून काही विचारायचे आहे का ?’, असे मला विचारत होते.

पुढे काही मासांनी त्यांनी सांगितलेले भविष्य तंतोतंत खरे ठरले. तेव्हा मला माझी चूक समजली. सनातन संस्थेत आल्यावर मला संतांचे महत्त्व कळले. ‘संत म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! ते कधीच रागावत नाहीत, सर्वांवर प्रेमच करतात. ते आध्यात्मिक अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करतात’, हे समजले. मला महाविद्यालयात भेटलेले संतही शांत आणि प्रेमळ होते; पण संतांशी कसे बोलावे ?, कसे वागावे ?’, हे तेव्हा मला ठाऊकच नव्हते. गुरुदेवांच्या कृपेने आता ते शिकायला मिळाले आहे. त्यासाठी मी गुरुचरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे.’   (क्रमशः)

– श्रीमती मनीषा विजय केळकर (वय ६८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. ( ४.१२.२०२३)


लहान वयात देवाचे विडंबन होत असल्याची जाणीव होणे

मी मराठी शाळेत असतांना वडील आम्हाला दिवाळीत फटाके आणून द्यायचे. त्यावर श्रीलक्ष्मी आणि श्री सरस्वती यांची चित्रे असत. लक्ष्मीपूजन झाल्यावर ते फटाके अंगणात लावल्यावर  देवींच्या चित्रांचे तुकडे व्हायचे अन् त्यांवर पायही दिला जायचा. तेव्हा माझ्या मनात ‘फटाके बनवणार्‍या आस्थापनाला हे कसे कळत नाही ?’, असा विचार येत असे; पण मी तो विचार सोडून देत असे.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यावर ‘फटाक्यांवर अशी चित्रे असणे अयोग्यच होते’, हे मला कळले.

– श्रीमती मनीषा विजय केळकर

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/778701.html