इस्लामाबाद – ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे. पाकिस्तानचे सैन्यदल आणि सुरक्षा यंत्रणा सुरक्षा या प्रकल्पाला पुरवण्यात अपयशी ठरत आहेत, असे चीनने म्हटले आहे. चीन ‘सीपीईसी’च्या अंतर्गत बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांत त्याचे सैन्य तैनात करणार आहे.
चीनचे राजदूत जियांग झेडोंग यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना सांगितला. गेल्या ७दिवसांत ग्वादर बंदरावर ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या आक्रमणात ३ चिनी अधिकारी घायाळ झाले, तर खैबरमध्ये आदिवासींच्या आक्रमणात ५ चिनी अभियंते ठार झाले. ‘सीपीईसी’मध्ये चिनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने १५ सहस्र सैनिकांचा विशेष सुरक्षा विभाग सिद्ध केला आहे. त्यानंतरही गेल्या २ वर्षांत ३० चिनी नागरिकांचा बळी गेला आहे.
चीन स्वतःचे गुप्तहेर आणि सशस्त्र दल तैनात करणार !
सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतांत चीनच्या ‘सीपीईसी’ प्रकल्पाविषयी स्थानिक लोकांमध्ये संताप आहे. चीन ‘बलुच लिबरेशन आर्मी’ आणि खैबरमधील आदिवासी यांच्या आक्रमणाच्या विरोधात सशस्त्र दल तैनात करणार आहे, तसेच गुप्तचर यंत्रणा सिद्ध करणार आहे.