घातक पिचकार्‍या !

होळीच्या दुसर्‍या दिवशी तिच्या पवित्र अग्नीतील राख अंगाला लावून साजरी केली जाते ती धुळवड आणि होळीनंतर ५ दिवसांनी येणारी फाल्गुन कृष्ण पंचमी, म्हणजे रंगपंचमी ! महाराष्ट्रात पूर्वापार धुळवड साजरी करण्याची प्रथा होती; परंतु हिंदी चित्रपटसृष्टीने आणलेल्या उत्तर भारतीय संस्कृतीच्या प्रभावामुळे होळीच्या दुसर्‍या दिवशीच महाराष्ट्रातही रंगपंचमी साजरी केली जाते. त्यामुळे होळीपूर्वी एक आठवडा आधीच बाजारपेठा पिचकार्‍यांनी फुलून गेल्या होत्या.

खरे तर लहान मुलांच्या भावविश्वातील काही खेळांपैकी ‘रंगपंचमी खेळणे’ हा त्यांच्या दृष्टीने आनंद देणारा खेळ खेळायचा हा सण असतो. यंदाच्या वर्षी बाजारात बंदूक आणि गॅस सिलिंडर यांच्या आकाराच्या पिचकार्‍या दिसल्या. काहींनी ‘सुपर पॉवर गन’च्या आकाराची भली मोठी पिचकारी सिद्ध केली आहे. सध्या पिचकारीसमवेत रंगीत पाणी साठवायला छोटी पिशवी (वॉटर टँक) मिळते. जसे दिवाळीचे दिवे ‘चिन्यां’च्या हातात गेल्याने त्यातील भारतीय परंपरा लोप पावत चालली होती, तसे पिचकार्‍याही पाश्चात्त्य विकृतीच्या अधीन झाल्या कि काय ? असे हे सारे पाहून वाटू लागले.

बंदुकीतून गोळी मारली जाते आणि सिलिंडरमधून गॅस बाहेर पडतो. या दोन घातक अशा गोष्टी पिचकारी म्हणून मुलांच्या हातात जाणार, हे यावरून लक्षात आले. बंदुकीची पिचकारी २५ रुपयांपासून १ सहस्र १०० रुपयांपर्यंत आणि सिलिंडरच्या आकाराची पिचकारी ९०० ते १ सहस्र १०० रुपयांपर्यंत होती. एवढे पैसे देऊन आपण मुलांच्या हातात ‘विध्वंसकतेचा संस्कार करणारे काही तरी देणार’, असेच हे पाहून वाटले. यामुळे पिचकारीचे मूळ रूप पालटून असे वेगळे काही तरी करण्यातून कुठे तरी परंपरेला अलगदपणे डावलले जाण्याला आरंभ होतो.

‘रंग लावणे’ आणि ‘रंगाचे पाणी उडवणे’ याला आपल्या संस्कृतीत एक अतिशय उच्च प्रतीचा आध्यात्मिक अर्थ आहे. रंगपंचमीच्या दिवशी वेगवेगळे रंगकण देवतेचे वातावरणातील वाढलेले तत्त्व आकर्षित करतात. ईश्वराप्रती भाव असणार्‍या व्यक्तीला या तत्त्वाचा लाभ होतो. हे अध्यात्मशास्त्र सध्या कुणाला समजणे कठीण आहे; परंतु निदान मुलांना आनंद तरी निखळ, निर्मळपणे घेता यावा. सणांचा उद्देशच केवळ मनोरंजन आणि मजा करणे येथपर्यंत मर्यादित झाल्याने अन् त्याचे व्यावसायिकीकरण वाढल्याने अशा गोष्टी होत आहेत. ‘पिचकारी’ म्हटल्यावर वृंदावनातील होळीची आठवण कुणाच्याही मनात जागृत होऊ शकते; परंतु अशा प्रकारे चित्र-विचित्र पिचकार्‍या आल्या, तर ती आठवण कशी येईल ? त्यामुळे सणांच्या व्यावसायिकीकरणासह परंपरा जपण्याचे भान हवे, असे वाटते.

– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.