पनवेल – पाताळगंगा नदीतील शिल्लक १० एम्.एल्.डी. पाणी पनवेल महापालिकेला मिळावे, यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला राज्याच्या जलसंपदा विभागाने अंतिम संमती दिली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पनवेलकरांना दिलासा मिळणार आहे. पाताळगंगा नदीच्या पाण्याचा अन्य प्राधिकरणांकडून पाणीउपसा केल्यानंतर १० एम्.एल्.डी. पाणी शिल्लक रहाते. हे पनवेल महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला समजल्यामुळे प्रशासनाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव संमत करून जलसंपदा विभागाकडे तो सादर केला होता. जलसंपदा विभागाचे जिल्हा कार्यकारी अभियंता, कोकणच्या जलसंपदा विभागाचे संचालक यांनी या प्रस्तावाला संमत मिळाल्यानंतर अंतिम संमतीच्या प्रतिक्षेत होता. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून प्रयत्न केले होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा प्रस्ताव संमत झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आदी भागांत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. लोणावळा येथील टाटा पॉवर वीजनिर्मिती केंद्रातील पाणी पाताळगंगा नदीत सोडले जाते. त्यानंतर हे पाणी पनवेलमधील वायाळ येथून उचलून ‘मजीप्रा’च्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. सिडकोच्या माध्यमातून पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरांना पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई महापालिकेचा प्रस्तावही देण्यात आला होता; परंतु तो अद्याप संमत झालेला नाही.