उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. श्रीनिधी पिंपळे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२१ मध्ये ‘चि. श्रीनिधी हरीश पिंपळे महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२४ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२०.३.२०२४) ॐ |
१. एकपाठी : ‘श्रीनिधी शिकवणी वर्गाला जाते. एकदा तिच्या शिकवणी वर्गाच्या शिक्षिका मला म्हणाल्या, ‘‘मी आतापर्यंत एवढी बुद्धीमान मुलगी पाहिली नाही. तिला एकदा अक्षरे लिहून दिली की, तिच्या अक्षरे लगेच लक्षात रहातात. अन्य मुलांना केवळ ‘क’ शिकायला दोन दिवस लागतात. श्रीनिधी एकपाठी आहे. मला कधी कधी ‘हिला कोणता अभ्यास देऊ ?’, असा प्रश्न पडतो.’’
२. इतरांचा विचार करणे : एकदा आम्ही (मी आणि श्रीनिधी) देवद आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत होतो. श्रीनिधी ध्यानमंदिराचे दार उघडत असतांना तिचे बोट दारात अडकले. त्या वेळी तिने हळू आवाजात केवळ ‘आई ग ऽऽ’, असे म्हटले. मी तिला उचलून बाहेर आणले. तेव्हा तिचे बोट आणि नख काळे-निळे झाले होते. ती ध्यानमंदिरातून बाहेर आल्यावर पुष्कळ मोठ्या आवाजात रडत होती. मी तिला विचारले, ‘‘तू ध्यानमंदिरात हळू आवाजात ‘आई ग’, असे म्हणालीस आणि बाहेर येऊन मोठ्या आवाजात का रडत आहेस ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘तेथे साधक नामजप करत होते; म्हणून मी हळू आवाजात बोलले.’’
३. संतांचे आज्ञापालन करण्याची तळमळ : एकदा आम्ही घरी जाणार होतो. तेव्हा आम्हाला पू. रत्नमाला दळवी (सनातनच्या ११८ व्या समष्टी संत, वय ४६ वर्षे) भेटल्या. त्या श्रीनिधीला म्हणाल्या, ‘‘२ दिवसांत परत ये.’’ मला घरी ८ दिवस रहायचे होते; मात्र तेथे जाऊन २ दिवस झाल्यावर श्रीनिधी मला म्हणाली, ‘‘पू. रत्नाताईंनी आपल्याला २ दिवसांत आश्रमात यायला सांगितले आहे. आपण आज रात्री आश्रमात जाऊया.’’ ती मला हट्टाने आश्रमात घेऊन आली. ‘संतांचे बोल किती अनमोल आहेत ! त्यांचे आज्ञापालन कसे करायचे ?’, हे माझ्या लक्षात आले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संग ऐकण्याची ओढ असणे : एकदा सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी श्रीनिधी झोपेतून उठली. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संगात बोलत होत्या. तेव्हा श्रीनिधी म्हणाली, ‘‘माझे केस विंचरू नकोस. मला सत्संग ऐकायचा आहे.’’ नंतर तिने सांगितले, ‘‘मला काही वेळ सत्संग ऐकता आल्यामुळे पुष्कळ आनंद झाला.’’ ती दुपारचा सत्संग ऐकू शकली नाही; म्हणून तिने रात्री माझ्या समवेत सत्संग ऐकला.
५. भाव
५ अ. आश्रमाप्रती भाव : एकदा ती तिच्या वडिलांच्या समवेत घरी जाणार होती आणि मी आश्रमातच रहाणार होते. तेव्हा मी तिला म्हणाले, ‘‘श्रीनिधी, तू घरी गेल्यावर मला आश्रमात करमणार नाही. तू जाऊ नकोस.’’ तेव्हा तिने मला प्रेमाने समजावून सांगितले, ‘‘आई, तू आश्रमात आहेस. येथे संत आणि सद्गुरु आहेत. तू सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांना सांग. त्यांची आठवण काढ.’’
५ आ. सद्गुरु आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती भाव
१. एकदा श्रीनिधीचे पोट दुखत होते. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिला खाऊ दिला. तेव्हा तिचे पोट दुखायचे थांबले. त्या वेळी श्रीनिधीला वाटले, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच सद्गुरु गाडगीळकाकांच्या माध्यमातून खाऊ दिला.’
२. एकदा रात्री श्रीनिधी मला म्हणाली, ‘‘मला परात्पर गुरुदेवांचा (सूक्ष्मातून) भ्रमणभाष आला होता.’’ मी तिला विचारले, ‘‘गुरुदेव काय म्हणाले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘गुरुदेवांनी मला आढावा (व्यष्टी साधनेचा) आणि भावसत्संग यांत उपस्थित रहायला सांगितले आहे.’’ त्या दिवसापासून ती माझ्या समवेत दुपारी भावसत्संगाला येते. मी तिला ‘आढाव्याला किंवा भावसत्संगाला येऊ नको’, असे सांगितल्यावर ती रडते.
३. एकदा ती शाळेत पाण्याची बाटली विसरली. दुसर्या दिवशी पाण्याची बाटली विसरू नये, यासाठी तिने परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली, ‘गुरुदेवा, तुम्हीच मला पाण्याची बाटली घेण्याची आठवण करा.’ तिने शाळेतून आल्यावर मला सांगितले, ‘‘मी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केली होती; म्हणून आज मी पाण्याची बाटली विसरले नाही.’’
५ इ. देवाप्रती भाव
१. एकदा आम्ही गावाहून आश्रमात येत होतो. तेव्हा एका व्यक्तीने श्रीनिधीच्या वडिलांना विचारले, ‘‘या मुलीचे लग्न करणार का ?’’ तेव्हा श्रीनिधीने सांगितले, ‘‘मी श्रीकृष्णाच्या समवेत लग्न करीन.’’
२. एकदा आश्रमात ध्वनीक्षेपकावर भक्तीगीत लावले होते. तेव्हा श्रीनिधी म्हणाली, ‘‘मला गाता येत नाही. मला गीतामुळे शक्ती मिळाली.’’ मी तिला विचारले, ‘‘आपल्याला शक्ती कोण देते ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘श्रीराम देतो. रामाची शक्ती असते.’’
– सौ. मनीषा पिंपळे (कु. श्रीनिधीची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१८.२.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |